नाना पाटेकर झाले गीतकार...'नानाछंद' अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सागरिका म्युजिककडून खास कार्यक्रमाचं आयोजन

नानाछंद'च्या माध्यमातून नाना पाटेकरांमधील गीतकार प्रेक्षकांच्या भेटीला. सागरिका म्युझिकडून खास कार्यक्रमाचं आयोजन
नाना पाटेकर झाले गीतकार...'नानाछंद' अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सागरिका म्युजिककडून खास कार्यक्रमाचं आयोजन
Published on

मुंबई: संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यास आवर्जून हजेरी लावली. संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. नानाछंदच्या निमित्तानं नाना पाटेकर यांच्यातील गीतकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश मोहरिर यांनी संगीतबद्ध केलेल्या या खास अल्बमला वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्निल बांदोडकर यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.

नानाछंद अल्बमचे अनावरण-

संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बोलताना हा अतिशय खास अल्बम रिलीज करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची भावना सागरिकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या अल्बमची मांडणी-निर्मिती विक्रम बाम यांनी केली आहे. वरद कठापूरकर, सचिन भांगरे, विनायक नेटके आणि इतर प्रतिभावान संगीतकारांनी वादन केलं आहे. अवधूत वाडकर, तुषार पंडित आणि अजिंक्य धापरे रेकॉर्डिंग आणि मिक्स इंजिनिअर आहेत.

ते शब्द आपसूक ओठावर...: नाना पाटेकर

नानाछंद अल्बमच्या अनावरण प्रसंगी नाना पाटेकर म्हणाले की, "मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या सगळ्याशी माझी खूप जवळीक आहे. अनेकदा ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना निलेशने अतिशय मेहनतीने सुरांमध्ये गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली. सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी या गीतांना सुंदरतेने एका अल्बमच्या माध्यमातून प्रकाशित केलं आहे. याचा अतिशय आनंद मला आहे. असे भावोद्गगार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले."

अमराठी असूनही मला स्विकारलं : सागरिका बाम

यावेळी सागरिका बाम म्हणाल्या की, "खरंतर अमराठी असूनही मला मराठी लोकांनी, इथल्या संस्कृतीने मला स्विकारलं. अतिशय मेहनतीने आज ‘सागरिका म्युझिक’ दिमाखात उभी आहे त्याला इथली आत्मियता कारणीभूत आहे. आजवर खूप मोठं पाठबळ मला संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी दिलं ते यापुढेही तसेच राहील यात मला अजिबात शंका नाही, असं मनोगत सागरिका बाम यांनी व्यक्त केलं."

logo
marathi.freepressjournal.in