
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, त्याच्या अभिनयामुळे नाही तर, त्याच्या खासगी आयुष्यात सुरु असलेल्या वादांमुळे तो चांगलाच वादात अडकला आहे. त्याची पत्नी आलिया ही सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. नवाजुद्दीनसह त्याचे कुटुंब आलियाचा छळ करत असल्याचे गंभीर आरोप तिने केले आहेत. यावर अखेर नवाजुद्दीनबे पळाले मौन सोडले असून, "शांत बसलो आहे म्हणून मी वाईट आहे, असे नाही. हा सर्व तमाशा माझ्या मुलांना कधीनाकधी कळणारच आहे." असे म्हणत त्याने आपली बाजू मांडली आहे.
नवाजुद्दीन सिद्दकीने एक पोस्ट शेअर करत या सर्व वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने यामध्ये लिहिले आहे की, "आतापर्यंत शांत बसलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात येत आहे. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच, म्हणूनच मी शांत होतो. समाज माध्यमे, प्रसार माध्यमे आणि काहीजण माझ्यावर होणाऱ्या टीकांचा आनंद घेत आहेत. मी सर्वांना सांगू इच्छितो की, गेल्या काही वर्षांपासून मी आणि आलिया एकत्र राहत नाही. आधीच आमचा घटस्फोट झाला आहे." असे त्याने स्पष्ट केले.
पुढे तो म्हणाला की, "आम्ही मुलांसाठी समजुतदारीने वागत होतो. माझी मुले अजून भारतामध्ये का आहेत? गेल्या ४५ दिवसांपासून ते शाळेमध्ये का गेली नाहीत? याचे कोणी मला उत्तर देणार आहे का? 'तुमची मुले शाळेत का येत नाहीत?' अशी आशयाची पत्रे मला त्याच्या शाळेमधून येत आहेत." असे त्याने सांगितले. पुढे तो म्हणाला की, "मी तिला प्रत्येक महिन्याला १० लाख रुपये देत आहे. पण ते सर्व पैसे स्वतःसाठी खर्च करत आहे. हा सर्व तमाशा फक्त माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे." असा दावा त्याने केला आहे.