
फक्त भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात अभिनेत्री माधुरी दीक्षितचा चाहतावर्ग आहे. भारतासोबतच तिच्या अभिनयाची कीर्ती सातासमुद्रापार पसरली आहे. अशामध्ये तिचा अपमान केल्याप्रकरणी नेटफ्लिक्सला नोटिस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कारण, या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'बिग बँग थिअरी' या कार्यक्रमाचा एक भाग काढून टाकण्यासंदर्भात ही नोटीस पाठवली आहे.
'बिग बँग थिअरी' कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात शेल्डन कूपरची भूमिका करणाऱ्या जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या एका सीनची तुलना केली आहे. यामध्ये ऐश्वर्या राय गरिबांची माधुरी दीक्षित असल्याचे म्हंटले आहे. यानंतर राज कूथरापल्ली या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध असलेला अभिनेता कुणाल नायर हा माधुरी दीक्षितबद्दल अपमानास्पद टिप्पणी करतो. "ऐश्वर्या राय देवीसारखी होती आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित ही कुष्ठरोगी वेश्या होती." असे विधान तो करतो. यामुळे हा कार्यक्रम माधुरीचा अनादर करणारा असल्याचे सांगत मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला याबाबत नोटीस बजावली. हा भाग लिंगभेद आणि महिलांविरोधात द्वेष पसरवण्याला प्रोत्साहन देणारा असल्याचे म्हंटले आहे.