स्कॉटिश हायलँडवर पोहोचला मराठी चित्रपट

स्कॉटिश हायलँडवर पोहोचला मराठी चित्रपट

'मुसाफिरा' या नव्या चित्रपटाची घोषणा

नुकतीच 'मुसाफिरा' या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा झाली. अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर जोग 'मुसाफिरा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी अभिनेत्री स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मैत्री हा विषय बॉक्स ऑफिसवर नेहमीच यशस्वी ठरला आहे. 'मुसाफिरा' हा चित्रपटही मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे.

'मुसाफिरा'बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' अलीकडे मराठी चित्रपटांनी चित्रीकरणासाठी भारताची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटाचे परदेशात चित्रीकरण करणे नवीन नाही. मात्र एक पाऊल पुढे टाकत 'मुसाफिरा'ने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन विक्रम प्रस्थपित केला आहे. निसर्गरम्य अशा स्कॉटिश हायलँड्सची सफर प्रेक्षकांची करमणूक द्विगुणित करेल हे नक्की. हा तरुणाईला आवडणारा विषय असला तरी हा एक कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट आहे. 'मुसाफिरा'चे चित्रीकरण पूर्ण झाले असून या वर्षाच्या अखेरीस 'मुसाफिरा' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.''

पुष्कर जोग यांचा यापूर्वी प्रदर्शित आलेला 'व्हिक्टोरिया' हा मराठी चित्रपट देखील स्कॉटलंडमध्ये प्रदर्शित झाला होता. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर मात्र 'मुसाफिरा' या चित्रपटाची वर्णी लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in