प्रिया बापट- उमेश कामत १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार; 'या' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; रिलीज डेटही सांगितली!

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
प्रिया बापट- उमेश कामत १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार; 'या' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; रिलीज डेटही सांगितली!
Published on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

पोस्टरमधील दृश्यामध्ये प्रिया हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने उभी आहे. निर्णयावर ठाम असल्याचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर उमेश हातात हार घेऊन, डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा आहे. जणू काही तो लग्नासाठी तयार आहे परंतु, परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. या सगळ्यांतून स्पष्ट होते की, ही गोष्ट पारंपरिक विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन नात्यांची नवी मांडणी करणारी आहे.

“प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असते. इतक्या वर्षांनी ते माझ्या चित्रपटातून एकत्र येत आहेत, याचा मला आनंद आहे. या चित्रपटाची संकल्पना हटके असून ती आजच्या काळाशी थेट संबंधित आहे’’ असे चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले. तर, “ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या गाठी सुटण्याची. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे, ज्यात प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब नक्की बघायला मिळेल. काहींना नव्याने प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तरं मिळतील. हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल’’, असे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in