नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक तणावातून? स्थानिक भाजप आमदार महेश बालदी म्हणाले...

या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक तणावातून? स्थानिक भाजप आमदार महेश बालदी म्हणाले...
Published on

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ही अनेकांना धक्का देणारी आहे. त्यांच्या जाण्याने सिने सिनेसृष्टीसह सांस्कृतीक क्षेत्रातील न भरुन निघणारी हानी झाली आहे. मुंबईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या कर्जत येथील प्रसिद्ध एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्या मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

भारतीय जनात पक्षाचे नेते आमदार महेश बालदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, नितीन देसाई हे काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या स्टुडिओत कोणताही मोठा सिनेमा आला नव्हता, फक्त मालिकांचं काम सुरु होतं. असं देखील बालदी म्हणाले. साधारण महिनाभरापूर्वी झालेल्या भेटीत देसाई यांनीचं याबाबत सांगितलं. तसंच सध्यातरी त्यांच्या आत्महत्येला आर्थिक तणाव हेच कारण असू शकतं असं देखील बालदी म्हणाले.

देसाई यांच्या आत्महत्येची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत येथील सेटवर एका कर्मचाऱ्यांने पोलिसांना देसाई यांच्या निधनाची बातमी दिली. यानंतर पोलिसांचं पथक स्टुडिओत पोहचल्यावर त्यांना नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. या प्रकरणाचे सर्व पैलू पडताळून पाहण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचं घार्गे यांनी सांगितलं.

नितीन देसाई गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी मुंबईच्या लालबागच्या राजासाठी पंडाल डिझाइन करण्यासाठी देखील ओळखले जात होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही आमच्यासाठी दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. रविवारी ते आमच्यासोबत त्यांच्या टीमसह जवळपास २ तास पंडालच्या कामावर लक्ष ठेवून होते. असं काही घडू शकतं याचा कोणताही मागमूस नव्हता. देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते. तसंच ते २००९ पासून आमच्यासोबत जोडले गेले होते. मध्यंतरी एक वर्ष त्यांची तब्येत खराब होती, त्यावेळी त्यांनी पंडालची रचना केली नसावी. अन्यथा, त्यानंतर ते आमच्यासोबत होते. त्यांनी आपलं काम नेहमी वेळेवर पूर्ण केलं. सर्वांनी नेहमी त्यांचं कौतूक केलं. ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. " असं साळवी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

नितीन देसाई यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. देसाई हे "हम दिल दे चुके सनम", "लगान", "जोधा अकबर" आणि "प्रेम रतन धन पायो" यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कलाकृतींसाठी ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीसह सांस्कृतीक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in