"ती माझ्या पाठीशी होती म्हणून हे घडलं..." नितीश चव्हाणने सांगितला अनुभव

Lakhat Ek Amcha Dada: झी मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला.
"ती माझ्या पाठीशी होती म्हणून हे घडलं..."  नितीश चव्हाणने सांगितला अनुभव
Published on

८ जुलैच्या रात्री ८:३० वाजता मराठी टेलिव्हिजनवर असं काही घडलं जे ह्या आधी प्रेक्षकांनी मराठी टेलिव्हिजनवर कधीच अनुभवलं किंवा पाहिलं ही नसेल. झी मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद यायला सुरुवात झाली. तो प्रतिसाद होता चार प्रेमळ बहिणींना, सूर्यादादाला आणि जेष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक जे या मालिकेत डॅडीची भूमिका साकारत आहेत. तसेच हा प्रतिसाद होता नितीश चव्हाणच्या दमदार व्यक्तिरेखेसाठी. या मालिकेतील एक सीन मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात नेहमीसाठी कोरला गेला तो म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला यात्रेचा सीन.

एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता हे व्यक्त करताना नितीशने सांगितले, " जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हा पासून मनात धाकधूक चालू होती. कसा होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला तेव्हा पर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं कारण अंगात येणं हे मी आज पर्यंत कधी अनुभवलं नव्हतं म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि स्वतःला पहिल्यांदा आरश्यात पाहिलं ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला. इतका कमाल लुक अस्तित्वात आणला होता. तो लुक पाहून ती भावना जागरूक झाली. यासाठी मला मेकअप दादांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. सीनसाठी मी तयार झालो. "

सीनसाठी तयार होऊन नितीश सर्वात आधी देवी समोर गेलो तिचाआशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की. त्यावेळी त्याने देवीला सांगितले की "मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्या कडून हे सर्व नीट करून घे. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला. सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले की माझ्याकडून हे तूच करवून घेतलं आहेस. आमचं त्या दिवशीच शूटिंग संपल्यावर ही परत मी परत देवीला भेटायला गेलो आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली ह्याचे आभार मानले कारण हे फक्त तिच्यामुळेच मी करू शकलो."

देवीच्या पालखीबद्दलही नितीशने सांगितलं की "ती २० किलोची पालखी होती आणि आर्ट दादांनी ही पालखी बनवून कमालच केली होती. २० किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डायलॉग्स बोलायचे हे सगळं करण्यात दमछाक होतं होती. एकदा, दोनदा मला चक्कर ही आली पण तरी ही मी थांबलो नाही कारण ती एक ऊर्जा आणि शक्ती अंगात होती. ही सगळी ऊर्जा देवींनीच दिली असं मी मानतो आणि ती पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो ज्याचा इतका उत्तम प्रतिसाद मिळत आहे."

'लाखात एक आमचा दादा' ही मालिका दररोज रात्री ८.३० वा. झी मराठीवर बघता येईल.

logo
marathi.freepressjournal.in