मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून 'जुनं फर्निचर' सिनेमाची चर्चा सुरू आहे. नुकतेच या सिनेमाच्या टीमने सोमवारी १५ एप्रिल रोजी ‘दै. नवशक्ति’च्या कार्यालयात भेट दिली. यावेळी सिनेमाच्या टीमने चित्रपटाविषयी बोलताना ज्येष्ठ व्यक्तींच्या एकूणच परिस्थितीबद्दल परखड भाष्य केले. तसेच सर्वांना तरूणांपासून वयोवृद्धांना विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे, असेही यावेळी कलाकारांनी म्हटले. दरम्यान, हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण ‘जुनं फर्निचर’मध्येही जाणवत आहे. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे 'ओल्ड फर्निचर' वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दरम्यान, ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट आहे.
मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून, आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
जुनं फर्निचर… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टिकोन बदलेल. तसेच सर्वांना तरूणांपासून वयोवृद्धांना विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.
-महेश मांजरेकर, दिग्दर्शक, अभिनेता
कलाकारांची मांदियाळी
दरम्यान, या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, यतिन जाधव ‘जुनं फर्निचर’चे निर्माते आहेत.