अभिनेते भारत गणेशपुरे सादर करीत असलेले मानवेंद्र आर्टस् व व्ही आर प्रॉडक्शन निर्मित सत्य घटनेवर आधारीत एक स्त्रीपात्री दिर्घांक “आवर्त” हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १६ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होत आहे. निर्माती – दिग्दर्शिका रमा नाडगौडा यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून त्यांचे लेखन त्यांनी सुचरिता या नावाने केले आहे. त्यांना आलेल्या अनेक अनुभवातून व त्यांना जाणवलेल्या प्रश्नांवरून या सुंदर कलाकृतीची निर्मिती झाली आहे. रमा नाडगौडा या स्वत: अभिनेत्री, लेखिका, कवियित्री असून अनेक मालिका, चित्रपट व नाटकात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या झी मराठीवर सुरू असलेली ‘तू तेव्हा तशी” या मालिकेत त्यांनी साकारलेली कावेरी आजी खूपच लोकप्रिय झाली आहे.
आवर्त म्हणजे भोवरा, ज्यात अडकलेला जीव प्राणपणाने झुंजत रहातो. भोवऱ्यात गरगरून जाताना त्यातून बाहेर पडण्यासाठी सामान्य स्त्रीनं केलेल्या एकाकी संघर्षाची ही गाथा आहे. ही गोष्ट एका सरीची असली तरी ती प्रत्येकाच्या मनाला भिडणारी आहे. सरीच्या मनाचे अव्यक्त तुकडे, दबलेल्या भावना यांचे प्रतीक या रुपात एक स्वतंत्र व्यक्तिमत्व यात मांडण्यात आले आहे.
अभिनेत्री रमा नाडगौडा यांनी ते सुचरिता या नावाने लिहिले असून निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, संकल्पना, वेशभुषा या सर्वाची जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. अभिनेत्री शिवकांता सुतार यांनी यातील सरी ही मुख्य भूमिका साकारली आहे. शिवकांता सुतार यांनी आपल्या अभिनयाने आव्हान समर्थपणे पेलले आहे. स्त्रीच्या मनातील दबलेल्या भावना त्यांनी अत्यंत मार्मिकपणे सादर केल्या आहेत. दादा परसनाईक यांनी संगीत दिले असून व्यवस्थापक राहुल पवार आणि सुत्रधार गोट्या सावंत आहेत. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी नाटकाचे निवेदन केले असून अभिनेते सयाजी शिंदे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी आणि अनिता दाते यांनी अभिप्राय दिला आहे.