Oscar 2024 मध्ये ‘ओपनहायमर’चा दबदबा; केली तब्बल ७ पुरस्कारांची लयलूट

ऑस्कर पुरस्कारांच्या १३ प्रकारांसाठी ओपनहायमरचे नामांकन झाले होते. त्यापैकी तब्बल सात ऑस्करचा मान या चित्रपटाला मिळाला.
Oscar 2024 मध्ये ‘ओपनहायमर’चा दबदबा; केली तब्बल ७ पुरस्कारांची लयलूट
Published on

लॉस एंजेलिस : जगातील पहिल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले अमेरिकी शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर बेतलेल्या 'ओपनहायमर' या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ७ पुरस्कारांची लयलूट करत धमाका उडवून दिला. ऑस्कर पुरस्कारांच्या १३ प्रकारांसाठी ओपनहायमरचे नामांकन झाले होते. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह तब्बल सात ऑस्करचा मान या चित्रपटाला मिळाला. 'पुअर थिंग्ज' या चित्रपटातील बेला बॅक्स्टरच्या भूमिकेसाठी एमा स्टोन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी ९६व्या अकादमी पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याला गाझा आणि युक्रेनमधील युद्धे आणि अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकांची राजकीय पार्श्वभूमी होती. पुरस्कारांसाठी नामांकन लाभलेले अनेक चित्रपट आणि माहितीपटही युद्धांवर आधारित होते. युक्रेन-रशिया युद्धातील मारियुपोल शहरात झालेल्या लढाईवर आधारित ‘ट्वेंटी डेज इन मारियुपोल’ या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी फीचरचा सन्मान मिळाला, तर दुसऱ्या महायुद्धातील नाझी सेनानी रुडॉल्फ हेस यांच्या जीवनावर आधारित कादंबरीवर बेतलेल्या ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार लाभला.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान सर्व प्रमुख देश अणुबॉम्ब हस्तगत करण्यासाठी धडपडत होते. अमेरिकेने लॉस अलामॉस येथे ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली मोठी प्रयोगशाळा स्थापन केली. तेथे हळूहळू टुमदार शहरच वसले. तेथेच अणुबॉम्बविषयी सुरुवातीचे संशोधन आणि प्रयोग केले गेले. प्रोजेक्ट मॅनहटन म्हणून गाजलेल्या या प्रकल्पावर अमेरिकेने त्या काळात २ अब्ज डॉलर्स खर्च केले होते. अखेर अमेरिकेचा अणुबॉम्ब तयार झाला आणि १६ जुलै १९४५ रोजी त्याची अल्मागोरोडो येथील वाळवंटात चाचणी घेतली गेली. ती यशस्वी झाल्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्याने अपरिमित संहार घडला. याचा सर्व घटनाक्रम चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

ओपनहायमरचे पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट चित्रपट : एमा थॉमस, चार्ल्स रोवेन, ख्रिस्तोफर नोलान

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलान

सर्वोत्कृष्ट अभिनेता : किलियन मर्फी

सर्वोत्कृष्ट सह-अभिनेता : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : हॉयटे व्हॅन हॉयटेमा

सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन : जेनिफर लेम

बेस्ट ओरिजिनल स्कोअर (गाणे) : लुडविग गोरान्सन

logo
marathi.freepressjournal.in