
न्यू मेक्सिको : ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन अभिनेते जीन हॅकमन (९५) हे न्यू मेक्सिकोतील सांता फे येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. संशयास्पद बाब म्हणजे त्यांची पत्नी बेट्सी अराकावा आणि त्यांचा कुत्रा देखील घरात मृतावस्थेत आढळला. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सहा दशकांच्या कारकीर्दीत हॅकमन यांनी दोन अकादमी पुरस्कार, दोन बाफ्टा पुरस्कार, चार गोल्डन ग्लोब आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला आहे.
१९७१मध्ये विल्यम फ्रेडकिनच्या थ्रिलर ‘द फ्रेंच कनेक्शन’मध्ये जिमी ‘पोपे’ डॉयलच्या भूमिकेसाठी हॅकमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. १९९२ मध्ये, क्लिंट ईस्टवुडच्या ‘अनफॉरगिव्हन’ या पाश्चात्य चित्रपटात लिटिल बिल डॅगेटच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला होता.