

मुंबई : नव्वदच्या दशकात ज्या गाण्याने अख्ख्या देशाला 'तिरछी टोपी' घालायला लावली आणि थिरकायला भाग पाडले, ते 'ओये ओये' आज पुन्हा एकदा नव्या रूपात अवतरले आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर २' या चित्रपटात या सुरावटींनी पुनरागमन केले असून, मूळ गायिका सपना मुखर्जी यांच्यासाठी हा केवळ जुन्या आठवणींना उजाळा नाही, तर त्यांच्या कलेचा झालेला एक उत्कट गौरव आहे.
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या 'स्पाय थ्रिलर'मध्ये ७० ते ९० च्या दशकातील गाण्यांचा असा काही खुबीने वापर केला आहे की, प्रेक्षक थेट त्या सुवर्णकाळात पोहोचतात. 'धुरंधरः द रिव्हेंज'च्या क्लायमॅक्समध्ये जेव्हा जमीर जमालीची (राकेश बेदी) गूढ कथा उलगडते, तेव्हा पार्श्वभूमीला सपनाजींचा तोच खणखणीत आवाज आणि अमित कुमार यांची साथ लाभलेले 'ओये ओये' कानावर पडते आणि मन आनंदाने उचंबळून येते.
भावना कधीच जुन्या होत नाहीत !
१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' ने जागतिक स्तरावर १००० कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. या यशात गाण्यांचाही मोठा वाटा आहे. सपनाजींच्या मते, हे गाणे केवळ एक 'ट्रेंड' नव्हते, तर ती एक 'भावना' होती आणि भावना कधीच जुन्या होत नाहीत.
जवानांपासून सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा प्रवास
या गाण्याबाबतचा एक योगायोग सांगताना सपनाजी भावूक झाल्या. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी CISF आणि NSG जवानांसाठी 'द ओये ओये शो' सादर केला होता. 'ज्या अभिमानाने जवानांनी हे गाणे गायले, ते पाहून माझेही मन भरून आले. आणि त्यानंतर लगेच हे गाणे मोठ्या पडद्यावर झळकले, जणू नियतीनेच हे वर्तुळ पूर्ण केले होते,' असे त्या सांगतात.
४०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या सपना मुखर्जी यांच्या कारकिर्दीत 'जानबाज'मधील 'प्यार दो प्यार लो' असो वा 'राजा हिंदुस्तानी'मधील 'तेरे इश्क में नाचेंगे', प्रत्येक गाण्याने इतिहास घडवला. पण 'ओये ओये' ही त्यांची खरी ओळख ठरली. त्यांच्या मते, कल्याणजी-आनंदजी, विजू शाह आणि गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचा पाया इतका भक्कम रचला होता की, आजही ते गाणे तितकेच ताजेतवाने वाटते.
तो क्षण माझ्यासाठी असेल मॅजिकल...
गप्पांच्या ओघात सपनाजींनी आपली एक मिश्किल इच्छाही बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, 'एखाद्या मोठ्या मंचावर माझ्या मूळ आवाजातील गाण्यावर साक्षात रणवीर सिंग थिरकताना पाहायला मला नक्कीच आवडेल. तो क्षण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने 'मॅजिकल' असेल !'
आवाज बदलला नाही, सन्मानाने जपलाय!
आजच्या काळात जुनी गाणी 'रिमिक्स' करताना मूळ गायकांना बाजूला सारून नवीन पिढीच्या आवाजाला पसंती दिली जाते. मात्र, सपना मुखर्जी यांनी आदित्य धर यांचे आभार मानताना एक अत्यंत मार्मिक गोष्ट सांगितली. त्या म्हणतात, 'आज माझा आवाज बदलला गेला नाही, तर तो सन्मानाने जपला गेला आहे. कलाकारासाठी यापेक्षा मोठी पावती दुसरी कोणती असू शकते? गाणी पुन्हा बनवता येतात, पण त्या गाण्याचा 'आत्मा' बदलता येत नाही.'