चित्रपट परीक्षण: 'फुलराणी' बनण्याचा अल्लड प्रवास

प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे याची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटातून शेवंता तांडेलचा अनोखा प्रवास प्रेक्षकांना पहायला मिळणार
चित्रपट परीक्षण: 'फुलराणी' बनण्याचा अल्लड प्रवास

‘प्रत्येकात काहीतरी खास दडलेलं असतं’, फक्त या 'खास' गोष्टीची जाणीव आपल्याला होणं गरजेचं असतं. आपल्यातील अल्लड, अवखळपणा जपत स्वत:चा वेगळा रुबाब घेऊन येणाऱ्या फुलवालीला आपल्यातली 'फुलराणी' कशी गवसते हे दाखवणारा 'फुलराणी' चित्रपट. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे याची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटातून शेवंता तांडेलचा अनोखा प्रवास प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

'फुलराणी’ म्हटलं की, हमखास डोळ्यासमोर येतो तो भक्ती बर्वे– इनामदार यांचा करारी चेहरा. मुळात 'ती फुलराणी’ हे नाटक म्हणजे ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. त्यावर आधारित विश्वास जोशी यांनी दिग्दर्शक म्हणून या नाटकाचे जुने आरेखन पुसून नव्याने 'फुलराणी’ सिनेमाच्या रुपात आरेखन केले आहे. ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘घे डबल’ सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शनाचा अनुभव आणि रुपेरी पडद्यावरील ‘नटसम्राट’च्या निर्मितीचा अनुभव घेतल्यानंतर ‘फुलराणी’ची कथा रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी मांडली आहे.

कथानक : या चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते ती एका ब्यूटी पेजेंट स्पर्धेपासून... ‘विक्रम राजाध्यक्ष’म्हणजेच सुबोध भावे 'वीआरजी’ या ग्रुमिंग कंपनीचे मालक आहेत. या ग्रुमिंग कंपनीच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मार्गदर्शनकरण्याचे काम सुबोध भावे म्हणजेच विक्रम राजाध्यक्ष करीत असतात. त्याच्या ग्रूमिंग एजन्सी मधील मुली सलग ब्यूटी पेजेंट स्पर्धा जिंकत असतात. या स्पर्धेदरम्यान विक्रम याची कोळीवाड्यातील फुले विकणाऱ्या शेवंता तांडेलशी भेट होते. यादरम्यान, एका साध्या फुले विकणाऱ्या आणि आगरी-कोळी भाषा बोलणाऱ्या मुलीला ब्यूटी पेजेंट स्पर्धेत जिंकून देण्याची पैज मॉडल ग्रूमिंग एजन्सी चालवणारा विक्रम स्वीकारतो. 'कोळीवाड्यातील फुलराणीला तो 'प्रिटी प्रिन्सेस' बनवणार, तिला ट्रेन करणार.' या पैजेभोवती फिरणारी सिनेमाची कथा आहे. या कथेत कोळीवाड्यातील फुले विकणाऱ्या शेवंता तांडेलचा 'फुलराणी'पासून ते ब्यूटी पेजेंट स्पर्धेची विजेती हा धडपडीचा, तिच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या सिनेमात पहायला मिळत आहे.

लेखन-दिग्दर्शन : या सिनेमाची कथा आणि संवाद लेखन विश्वास जोशी आणि गीतकार गुरु ठाकूर यांनी केले आहे. स्वतः गीतकार सिनेमालेखक असल्यामुळे चित्रपट हा काव्यमय आहे. या चित्रपटातील गाण्याचे हे बोल शेवंता या पात्राला आणि फुलराणी व्यक्तिरेखेला पडद्यावर जिवंत करतात. ही फुलराणी, नाटकातील पिरीओडिक फुलराणी नसून, ती आजची अतिशय ट्रेंडी मुलगी आहे, या चित्रपटात सातत्याने मॉडेलिंग आणि ग्रुमिंग, असे विषय असल्यामुळे प्रेक्षकांना पूर्णपणे वेगळे व्हिजुअल्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, प्रेक्षकांनी या चित्रपटाची तुलना 'ती फुलराणी' या नाटकाशी करायला नको. या ट्रेंडी 'फुलराणी'कडे नव्याने पाहायला हवे.

चित्रपटाची पटकथा आपल्याला गुंतवून ठेवते; मात्र, 'फुलराणी’ नाटकाची कथा रुपेरी पडद्यावर साकरताना काही वेगळे ट्रॅक्स ओपन करताना चित्रपटाची गती थोडी मंदावली असून, पसारा वाढला आहे. चित्रपटाचे संकलन करताना अनेक ठिकाणी कात्री चालवताना लक्ष देण्याची गरज होती, तर अनेकदा कंटिन्यूटीमध्ये काही उणीवा राहिल्या आहेत. प्रियदर्शनीने फुलराणीची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारली आहे. तिने या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत आपल्याला पडद्यावर दिसते. त्यामुळे 'झगामगा.... मला बघा' म्हणणाऱ्या शेवंताला म्हणजेच 'फुलराणी'ला पहायला हरकत नाही.

सिनेमा : फुलराणी

दिग्दर्शक : विश्वास जोशी

निर्माते : जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर

कलाकार : सुबोध भावे, प्रियदर्शनी इंदलकर, स्वर्गीय विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, सायली संजीव, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, दिपाली जाधव, गौरव मालणकर

प्रस्तुती : फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृताफिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’

शैली : रोमँटिक ड्रामा

कालावधी : २ तास ३५ मिनिटे

स्टार : तीन स्टार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in