
नवनीत बऱ्हाटे /उल्हासनगर
महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी चित्रपटातील ऐतिहासिक युद्धदृश्यांच्या तयारीसाठी कल्याण आणि उल्हासनगर येथील सुप्रसिद्ध युद्धकला प्रशिक्षक प्रणय शेलार (भार्गव) यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी आणि इतर युद्धकौशल्यांचे कसून प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान कलाकारांनी तलवारबाजी, घोडेस्वारी करत युद्ध, भालाफेक व इतर पारंपरिक युद्धतंत्र शिकले. या कठोर प्रशिक्षणामुळे चित्रपटातील युद्धदृश्ये अधिक वास्तवदर्शी आणि प्रभावी झाल्याची चर्चा आहे.
कल्याण आणि उल्हासनगर या शहरांच्या सीमेवर असलेल्या मानेरेगावमधील शिवगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख प्रणय शेलार (भार्गव) यांच्या मार्गदर्शनाखाली आठ महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर कलाकारांनी युद्धकलेतील बारकावे आत्मसात करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला नव्या तेजाने मोठ्या पडद्यावर साकारले आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक, लाठी काठी, दांडपट्टा अशा पारंपरिक मराठा युद्धतंत्राचे कसून प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारांनी लढाईतील जलद हालचाली, आक्रमक युद्धनीती आणि महाराजांचे दुर्मिळ कौशल्य यांचा अप्रतिम मिलाफ मोठ्या पडद्यावर उभा केला. ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा पहिल्या दिवसापासूनच एक स्पष्ट दृष्टिकोन होता तो म्हणजे “मराठ्यांचे युद्धकौशल्य मोठ्या पडद्यावर वास्तवदर्शी भासले पाहिजे!” त्यासाठी त्यांनी कल्याणचे सुप्रसिद्ध युद्धकला प्रशिक्षक प्रणय (भार्गव) शेलार यांना जबाबदारी दिली, ज्यांनी कलाकारांना ८ महिने कठोर युद्धकला प्रशिक्षण दिले.
प्रणय शेलार यांनी केवळ प्रशिक्षक म्हणूनच नव्हे, तर ‘छावा’ चित्रपटात प्रत्यक्ष भूमिकाही साकारली आहे. “चित्रपटाच्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरच्या लढाईतील युद्धदृश्यमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मला वाचवण्यासाठी घेतलेली उडी, मी बाण मारून आग लावण्याचा सीन तसेच संगमेश्वरच्या जंगलातील युद्धदृश्ये अप्रतिम चित्रित करण्यात आली आहेत,” असे शेलार यांनी सांगितले. युद्धकलेत पारंगत असलेल्या शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून प्रणय शेलार गेली १३ वर्षे मराठ्यांच्या परंपरागत युद्धतंत्राचे प्रसार व प्रशिक्षण देत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची मेहनत आणि पारंपरिक मराठा युद्धकलेची ताकद पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे.
प्रशिक्षण घेतलेले मुख्य कलाकार
विकी कौशल (छत्रपती संभाजी महाराज) - दोन हातात तलवार आणि दांडपट्टा हाताळण्याचे पारंपरिक प्रशिक्षण
रश्मिका मंदाना (महाराणी येसूबाई भोसले) - तलवारबाजी
आशुतोष राणा (हंबीरराव मोहिते) - मराठा लढाईतील विशेष युद्धनीती
छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम मोठ्या पडद्यावर न्याय देऊन साकारण्यासाठी कलाकारांना युद्धकलेचे सर्व बारकावे शिकवण्याची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद आणि भावनिक क्षण होता. हा केवळ चित्रपट नव्हता, तर एक ऐतिहासिक जबाबदारी होती.
- प्रणव शेलार