
अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) 'धर्मवीर' या मराठी चित्रपटामध्ये शिवसेनेचे स्वर्गीय नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. यावेळी सर्व स्थरांतून त्याने साकारलेल्या या भूमिकेचे कौतुक झाले. आता त्यानंतर प्रसाद ओक एका नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली, तो म्हणजे 'तोच मी प्रभाकर पणशीकर'. प्रसिद्ध नाटककार, दिग्गज अभिनेते स्वर्गीय प्रभाकर पणशीकर (Prabhakar Panshikar) यांच्यावर आधारित हा बायोपिक असणार आहे.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर पोस्टवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘नवं वर्ष, नवं स्वप्न सोबत जुनेच मित्र कलावंत आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत'. त्यामुळे आता प्रभाकर पणशीकर यांच्या मुख्य भूमिकेत प्रसाद ओक असणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर, 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘हर हर महादेव’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे हे लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका निभावणार आहेत. तसेच, श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.
तब्बल ५० वर्षे नाट्यक्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे 'प्रभाकर पणशीकर'
प्रभाकर पणशीकर यांना 'पंत' म्हंणूनही ओळखले जाते. मुंबईमध्ये लहानाचे मोठे झालेले प्रभाकर पणशीकर यांचा रंगभूमीचा संबंध लहानपणापासूनच होता. ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. 'इथे ओशाळला मृत्यू', 'अश्रूंची झाली फुले', 'तो मी नव्हेच' ही त्यांची विशेष गाजलेल्या नाटकांपैकी एक आहेत. त्यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नाटकांचे ८ हजाराहून अधिक प्रयोग केले. मराठीसोबतच त्यांनी गुजराती आणि कानडी नाटकांमध्येही कामे केली. त्यांनी ४ चित्रपट, ४ मालिका तसेच एका इंग्रजी मालिकेमध्येही काम केले होते. तब्बल ५ दशके नाट्यक्षेत्र गाजवणाऱ्या पंतांनी १३ जानेवारी २०११मध्ये कायमची एक्झिट घेतली.