'मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय...', प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांसमोरच मिश्किल टिप्पणी

नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे, असे प्रतिपादनही दामले यांनी यावेळी केले.
'मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय...', प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांसमोरच मिश्किल टिप्पणी

"आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे, ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. नाट्य परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय", अशी मिश्कील टिप्पणी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी चिंचवडमध्ये केली. ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे, असे प्रतिपादनही दामले यांनी यावेळी केले.

चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी "वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.

मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी -

तर, शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि१०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

१०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने मी नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापिठात नाट्य विभाग आहे मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in