
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही काँग्रेसवर फेक न्यूज पसरवल्याबद्दल चांगलीच भडकली आहे. ''लाज बाळगा'', असे म्हणत तिने भाजपकडून तिच्यावरील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे १८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करून घेतल्याच्या फेक न्यूजबाबत काँग्रेसला फटकारले आहे. बॉलिवूड अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. तसेच तिच्या काही पोस्टबाबत ती ट्रोलही होत आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
केरळ काँग्रेसच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर सोमवारी (दि.२४) अभिनेत्री प्रिती झिंटावर आरोप करणारी एक पोस्ट लिहिण्यात आली. यामध्ये प्रितीवर तिने तिचे सोशल मीडिया अकाउंट भाजपला चालवायला दिले असून न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेकडून घेतलेले तिचे १८ कोटी रुपये माफ करून घेतले. गेल्या आठवड्यात ही बँक कोसळली असून ठेवीदार त्यांच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, असे आरोप करण्यात आले.
या पोस्टवर प्रितीने मंगळवारी (दि. २५) प्रतिक्रिया देत काँग्रेसवर कडक टीका केली आहे. ती म्हणाली की, ''माझे सोशल मीडिया खाते मी स्वतःच चालवते. खोट्या बातम्यांचा प्रचार केल्याबद्दल लाज वाटू द्या. माझे कर्ज माफ करण्यासाठी कोणीही काहीही लिहिलेले नाही आणि मी कोणतेही कर्ज बुडवलेले नाही. एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी माझ्या नावाचा आणि प्रतिमांचा वापर करून खोट्या बातम्यांचा प्रचार करत आहे आणि या माध्यमातून वाईट गॉसिप आणि क्लिक बेट्स मिळवत आहे. याचे मला आश्चर्य वाटते आणि मला चांगलाच धक्का बसला आहे.''
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १८ कोटींच्या कर्जविषयी प्रिती काय म्हणाली?
प्रितीने तिच्या कायदेशीर टीमद्वारे एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये तिने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कथित कर्जप्रकरणाविषयी स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली, '' १२ वर्षांपूर्वी माझ्याकडे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत ओव्हरड्राफ्टची सुविधा होती आणि १० वर्षांपूर्वीच मी या ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या संदर्भात सर्व थकबाकीची पूर्ण परतफेड केली होती आणि हे खाते बंद झाले होते,'' असे तिने निवेदनात म्हटले आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील मोठा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेच्या कामकाजावर कारवाई केली होती. तसेच खातेधारकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मनाई करण्यात आली होती. याप्रकरणी बँकेच्या माजी महाव्यवस्थापकासह अन्य काही आरोपींना अटक करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, या घोटाळ्यात वेगवेगळ्या हायप्रोफाईल कर्ज प्रकरणे चौकशीत उघडकीस आली. प्रिती झिंटाचे प्रकरण देखील त्यापैकीच एक होते, अशी माहिती समोर आली होती.
AI chatbot Grok3, PM मोदींची स्तूती; सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल
बॉलिवूडचे ९० चे दशक गाजवणारी प्रिती झिंटा ही गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. मात्र, ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विशेष करून X (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून सातत्याने ॲक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी तिने AI चॅटबॉट Grok3 शी संवाद साधण्याचा तिचा अनुभव शेअर केला. मात्र, या पोस्टवरून तिला पेड प्रमोशन केल्याबद्दल ट्रोल करण्यात येत होते.
सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगविषयी सुद्धा तिने मत व्यक्त केले होते. तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले, ''पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यास तुम्ही 'भक्त' आणि स्वतःला हिंदू किंवा भारतीय असण्यावर अभिमान आहे असे म्हटल्यास तुम्ही त्यांना लगेच 'अंधभक्त' म्हणता! असं म्हणत तिने ट्रोलर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिची सोशल मीडियावरील ही पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
प्रिती झिंटा हिने उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभात हजेरी लावत 'सत्यम शिवम् सुंदरम', असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
दरम्यान, बॉलीवूडपासून लांब राहिल्यानंतर प्रिती आता पुन्हा कमबॅकसाठी सज्ज आहे. 'लाहोर १९४७' या चित्रपटातून पुनरागमन करण्यास ती सज्ज झाली आहे. या चित्रपटात सनी देओल आणि त्याचा मुलगा करण देओल यांच्याही भूमिका असणार आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाला आमिर खान प्रॉडक्शनचे पाठबळ आहे.