प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत ; म्हणाल्या, "लक्ष्मीकांतच्या जाण्यानंतर..."

अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचा 'ती सध्या काय करते' हा चित्रपट चांगलाच गाजला होता.
प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत ; म्हणाल्या, "लक्ष्मीकांतच्या जाण्यानंतर..."
Published on

मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण असं आहे की, प्रियाने तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई' मालिकेत त्या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठेंच्या भूमिकेत लवकरच झळकणार आहेत. नुकतंच प्रिया बेर्डेंनी प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर एकटीने मुलांचं संगोपन कसं केलं? याबद्दल भाष्य केले होतं

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी एकट्याने मुलांचे पालनपोषण आणि संगोपन केलं. नुकतंच त्यांनी 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या या संघर्षाबद्दल सांगितलं.

यावेळी त्या म्हणाल्या, "मी माझ्या मुलांचा एकटीने सांभाळ करत होते. सिनेसृष्टीत काम करत असताना मला माझ्या मुलांना बाहेर ठेवावं लागलं. माझी मुले माझ्या जवळ नव्हती. मुलं पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये मोठी झाली. कारण मला आई-वडील नाही, सासू-सासरे नाही, बहिण-भाऊही नाहीत. जरी ते सगळे असते तरी त्यांनी माझ्या मुलांना सांभाळावं अशी मी अपेक्षा मी कधीच केली नसती.

माझ्या सासरकडची सर्व मंडळी आहेत, पण प्रत्येकाचा प्रत्येकाला संसार हा असतो. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझ्या आयुष्यात कोणीही नव्हतं. त्यावेळी मला नाईलाजाने माझ्या मुलांना हॉस्टेलला ठेवावं लागलं. ते पुण्यामधील सिंहगड परिसरात असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहत होते. माझी दोन्हीही मुलं दहावीपर्यंत तिथेच होती. मी माझ्या मुलांना महिना-दोन महिन्यांनी मोठं होताना बघत होते", असं प्रिया बेर्डे म्हणाल्या होत्या.

अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचा 'ती सध्या काय करते' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याच्या या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. तर आता मुलगी स्वानंदी बेर्डे हिने नाटकाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ती 'धनंजय माने इथंच राहतात..' या नाटकामध्ये झळकताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in