
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर घडणार आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनानंतर प्रदर्शित करण्यात आली. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत असून, प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर झळकली आहे.
टीझरमध्ये ऐकू येणारे ‘राजं… राजं’ हे शब्द आणि त्यामागची भावना लक्ष वेधून घेणारी आहे. संवादांमधून ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा आविष्कार करताना ऊर्जा आणि प्रेरणाही जाणवते. दृश्यरचना आणि पार्श्वसंगीतातून एक विशिष्ट वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
चित्रपटाचा उद्देश केवळ ऐतिहासिक घटनांची मांडणी करणं नसून, त्या माध्यमातून आजच्या काळाशी साधलेली जोड अधोरेखित करणं आहे. याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “शिवाजी महाराज ही केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर एक विचार आहेत. हा चित्रपट त्यांच्या विचारांच्या प्रकाशात वर्तमान काळातील काही प्रश्नांकडे पाहण्याचा प्रयत्न करतो.”
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट भूतकाळाची आठवण करून देतानाच, नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांची तत्वं आणि मूल्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. दिवाळीत तो प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याची उत्सुकता सध्या वाढताना दिसते.