पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी डॉ. अत्रे यांना गौरवण्यात आले
पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीतक्षेत्रातून एक दुःखद घटना समोर आली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. प्रभा अत्रे या आज 'स्वरप्रभा' कार्यक्रमासाठी पुण्याहून मुंबईला निघणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आले होते. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गात होत्या आणि प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असायच्या.

नातेवाईक अमेरिकेत -

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे झोपेत असताना प्रभा यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेचच उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचे निधन झाले होते. प्रभा अत्रे यांचे सगळे जवळचे नातेवाईक अमेरिकेत असल्यामुळे ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रभा यांचा संगीतातील प्रवास-

प्रभा यांचा जन्म पुण्यात झाला .वयाच्या आठव्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होता. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा चांगला गाढा अभ्यास होता. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.

पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांच्या होत्या मानकरी-

प्रभा अत्रे यांनी भारतात व परदेशात संगीत विषयावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. तसेच संगीतावर आधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्‍या पद्मविभूषण पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी डॉ. अत्रे यांना गौरवण्यात आले होते. त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in