मध्यंतर
-दिलीप ठाकूर
चित्रपट माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी रसिकांसमोर सादर केल्या जातात. कोणी झटपट यशासाठी आयटम साँगचा मसाला पेरतो, तर कोणी वास्तववादी चित्रपटाची कास धरतो. असाच एक प्रवाह संतपटांचा. अर्थात आदर्शपटांचा. असाच एक मराठी चित्रपट 'रघुवीर'.
या चित्रपटात समर्थ रामदास स्वामींचे जीवनचरित्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. सचिन खेडेकरच्या अतिशय उत्तम अशा निवेदनाने सुरू होणारा हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचे जीवन जगासमोर येणार आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
सोळाव्या शतकातील ही गोष्ट आहे. संत रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेले कार्य व त्यांची समाजासाठी असलेली शिकवण या चित्रपटात पाहायला मिळते. १६०८ साली जांब गावी सूर्याजी पंत आणि राणूबाई यांना द्वितीय पुत्रलाभ झाला, त्याचे नाव ठेवण्यात आले नारायण. बाराव्या वर्षी तो लग्नमंडपातून पळतो. कारण त्यास असे संसारात रमायचे नव्हते. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत ते तल्लीन होतात आणि जनसामान्यांना भक्तीचे महत्त्व सांगतात, आयुष्याचा अर्थ समजावतात. ते व्यायामाचेही महत्त्व पटवून देतात. या सगळ्यातून हा चित्रपट आकार घेतो. अधूनमधून त्याला माहितीपटाचे स्वरूप प्राप्त होते. हा दोष वगळता चित्रपटामागचा हेतू साध्य होतो हे जास्त महत्त्वाचे.
डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगाने समर्थ क्रिएशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्माते अभिनव विकास पाठक, तर सहनिर्माते वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर आहेत. मार्केटिंग पार्टनर खुशी ॲडव्हर्टायझिंग आयडियाज प्रा. लि. आहेत. सिनेपोलीस या चित्रपट वितरण समूहाच्या माध्यमातून ''संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. मराठीत सध्या एकाच वेळेस अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण होत असताना अशा आदर्शवादी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी जागा मिळणे काहीसे अवघड असते. तरीदेखील या चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी खूपच चांगली झाली. 'रघुवीर' नावाचा चित्रपट पडद्यावर येत आहे, हे प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचले. या चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये स्क्रीन मात्र फारसे मिळाले नाहीत. निलेश अरुण कुंजीर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांनी चित्रपटाचा हेतू चांगल्या प्रकारे पडद्यावर साकारलाय. समर्थ रामदास स्वामींची भूमिका विक्रम गायकवाड यांनी उत्तम साकारली आहे. त्यांनी भूमिकेचे भान व चित्रपटाचा आवाका सांभाळलाय. समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणणे हे एक फार मोठे आव्हान आहे. ऐतिहासिक दस्तावेजांसोबतच इतिहासकालीन साहित्याचा अभ्यास करून मोठ्या पराकाष्ठेने रामदास स्वामींना पडद्यावर सादर केले आहे, याची दखल घ्यायलाच हवी. इतर चित्रपटांप्रमाणे हे काम लगेच होणारे नसल्याने व्यवस्थित वेळ घेऊन सर्व काम पूर्ण करून एक बऱ्यापैकी दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सिनेमातले मुख्य पात्र हे हिरो म्हणून न वावरता सर्वसामान्य माणसाप्रमाणे ते दिसलेय आणि त्यातूनच सामान्यातला असामान्य अशा संत समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घडते. तात्पर्य, या चित्रपटाची निर्मिती निरपेक्ष वृत्तीने झाली असून, त्याची दखल घेणे आवश्यक आहेच.
समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, तसेच त्यांनी केलेले कार्य यापुढेही अविरतपणे चालूच राहावे यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी अशी निर्माता अभिनव पाठक यांची इच्छा होती. त्यानुसार, बरेच परिश्रम घेऊन सिनेमा बनवण्यात आला आहे. हे आवर्जून सांगायलाच हवे. अभिराम भडकमकर यांच्या साथीने दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. अभिराम भडकमकर यांनी संवादलेखनही केले असून, सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहेत. अभिराम भडकमकर साहित्य क्षेत्रातील एक हुकमी वाचकवर्ग असलेले नाव असून, चित्रपट या दृश्य माध्यमातील लेखनाची मांडणी त्यांस उत्तमरीतीने ज्ञात असल्याचे दिसून येते. प्रत्येक कलाकारांनी आपल्याला भूमिकेला न्याय दिला आहे. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना अजित परब यांचे संगीत आहे. सिनेमॅटोग्राफी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांचे, तर संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे. या सिनेमाचे चित्रीकरण जव्हार, राजस्थान, मनाली या ठिकाणी करण्यात आले आहे. बाह्यचित्रीकरण जमेची बाजू ठरली आहे.
अशा आदर्शवादी चित्रपटांसाठी कदाचित मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट रसिक किती प्रमाणात येतील याची काहीशी चिंता असतेच. फार पूर्वी म्हणजेच सत्तरच्या दशकात असे चित्रपट पुन्हा रसिकांसमोर आणताना खास करून रविवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी एका खेळासाठी प्रदर्शित होत. तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये ते दाखवले जात. आताही गावागावांतील शाळेत या 'रघुवीर' चित्रपटाचे खेळ आयोजित करता आल्यास अतिशय उत्तम.
श्रेणी - *** (थ्री स्टार)
कलाकार : विक्रम गायकवाड, ऋजुता देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवळकर, अनुश्री फडणीस, देव निकारगे, गणेश माने
दिग्दर्शक : निलेश कुंजीर, निर्माते : अभिनव विकास पाठक, वेळ : २ तास ५ मिनिटे
सिनेमॅटोग्राफी : धनराज वाघ आणि प्रथमेश रांगोळे , संवादलेखन : अभिराम भडकमकर