ऐश्वर्या म्हणाली- माझे वडील 'संघी' नाहीत, Rajinikanth नी घेतली मुलीची बाजू; दिले स्पष्टीकरण

ऐश्वर्याच्या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अखेर रजनीकांत यांना बचावासाठी यावे लागले.
ऐश्वर्या म्हणाली- माझे वडील 'संघी' नाहीत, Rajinikanth नी घेतली मुलीची बाजू; दिले स्पष्टीकरण

सिनेविश्वातील 'थलैवा' रजनीकांत त्यांच्या आगामी 'लाल सलाम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च कार्यक्रम झाला, ज्यामध्ये रजनीकांत यांची मुलगी आणि चित्रपटाची दिग्दर्शिका ऐश्वर्या (ऐश्वर्या रजनीकांत) हिने केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले. त्यावरून वाद सुरू होताच आता रजनीकांत यांनी मुलीची बाजू घेतली आहे.

वडिलांना संघी म्हटल्यामुळे भडकली होती ऐश्वर्या -

26 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये झालेल्या 'लाल सलाम'च्या ऑडिओ लॉन्च इव्हेंटमध्ये माध्यमांशी बोलताना ऐश्वर्याने, माझे वडील कोणी 'संघी' नाहीत असे म्हटले होते. या कार्यक्रमात ऐश्वर्या सोशल मीडियावर तिच्या वडिलांवर अलीकडेच झालेल्या व्यक्तीगत टीकेबद्दल खुलेपणाने बोलली, यावेळी ती चिडली देखील होती. ऐश्वर्या म्हणाली, "मी सहसा सोशल मीडियापासून दूर राहते, पण माझी टीम अनेकदा मला काय होत आहे ते सांगत असते आणि काही पोस्ट दाखवत असते. ते बघून मला राग यायचा. आम्हीही माणसंच आहोत. अलीकडच्या काळात बरेच लोक माझ्या वडिलांना फोन करतात आणि म्हणतात की ते संघी आहेत. मला त्याचा अर्थ माहित नव्हता. मग मी कोणालातरी संघी म्हणजे काय असे विचारले आणि त्यांनी सांगितले की, जे लोक राजकीय पक्षाचे समर्थन करतात त्यांना संघी म्हणतात. मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, रजनीकांत हे संघी नाहीत. ते जर संघी असते तर 'लाल सलाम' सारखा चित्रपट कधीच केला नसता." ऐश्वर्याच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता, काही लोकांनी रजनीकांत यांच्या मुलीच्या वक्तव्याला धर्म आणि हिंदुत्वाशी जोडून टीका करण्यास सुरुवात केली होती. वाढता वाद पाहता रजनीकांत यांनी स्वतः आपल्या मुलीचा बचाव केला आहे.

रजनीकांत यांनी दिले स्पष्टीकरण-

ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अखेर रजनीकांत यांना बचावासाठी यावे लागले. अलीकडेच, चेन्नई विमानतळावर स्पॉट झालेल्या रजनीकांत यांनी मीडियाशी बोलताना आपल्या मुलीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. "संघी हा वाईट शब्द आहे असे माझ्या मुलीने कधीच म्हटले नाही. तिचे वडील अध्यात्मात असतानाही लोक त्यांना असे का बोलतात, असा प्रश्न ती फक्त उपस्थित करत होती", असे स्पष्टीकरण रजनीकांत यांनी तमिळमध्ये बोलत दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in