ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित कांतारा चॅप्टर-१ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. अलिकडेच, एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने 'कांतारा' चित्रपटातील 'दैव'च्या भूमिकेची नक्कल केली होती. यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलिंगनंतर, रणवीरने नक्कल केल्याबद्दल माफी देखील मागितली होती. यावर आता, ऋषभ शेट्टीने रणवीर सिंहचे थेट नाव न घेता ‘दैव’ नक्कलच्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'जेव्हा कोणी माझ्या संस्कृती किंवा परंपरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला 'अस्वस्थ' वाटते असं तो म्हणाला.
दैव नक्कलच्या वादावर ऋषभ शेट्टीने सोडलं मौन
चेन्नई येथे झालेल्या ‘बिहाइंडवूड्स’ कार्यक्रमात अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी कांतारामधील 'दैव' सीनची मिमिक्री करण्यावर आपले मत स्पष्टपणे मांडले. तो म्हणाला की, "जेव्हा लोक रंगमंचावर 'दैव'ची नक्कल करतात तेव्हा मला खूप 'अस्वस्थ' वाटते. चित्रपटातील बराचसा भाग हा अभिनयाचा असतो. पण ‘दैव’ हा सिनेमातील सर्वात संवेदनशील आणि पवित्र भाग आहे. मी जिथेही जातो तिथे लोकांना विनंती करतो की, त्यांनी मंचावर अशा प्रकारचे सादरीकरण करू नये किंवा त्याची थट्टा करू नये. कारण, आम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेलो आहोत."
रणवीर सिंहने नेमकं काय केलं होतं?
३० नोव्हेंबर रोजी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप कार्यक्रमात रणवीर सिंहने ‘कांतारा’ पाहिल्याचा अनुभव सांगताना 'दैव' सीनची मिमिक्री केली होती. “मी कांतारा थिएटरमध्ये पाहिला. ऋषभचा अभिनय जबरदस्त होता, विशेषतः जेव्हा दैव अंगात येतं तो सीन,” असं म्हणत रणवीरने मंचावर तो सीन सादर केला. यावेळी तो दैवचा उल्लेख करताना स्त्री-भूत असे म्हणाला होता.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रणवीर सिंहवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेक युजर्सनी हा प्रकार देवी-दैवतांचा अपमान असल्याचं म्हटलं, तर काहींनी ‘कांतारा’च्या पुढील भागात रणवीर नको, अशी मागणीही केली.
रणवीर सिंहचा माफीनामा
वाद वाढल्यानंतर रणवीर सिंहने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे जाहीर माफी मागितली. “माझा हेतू ऋषभच्या अप्रतिम अभिनयाचं कौतुक करण्याचा होता. कलाकार म्हणून मला त्या सीनमागची मेहनत कळते आणि त्याबद्दल मला त्याच्याविषयी प्रचंड आदर आहे,” असं त्याने म्हटलं.
“मी आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा मनापासून आदर करतो. माझ्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो,” असंही रणवीरने स्पष्ट केलं.
दरम्यान, रणवीर सिंहचा सध्या प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.