मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून यावेळी त्याच्याकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे, असे बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सलमान खानने दोन कोटी रुपये दिले नाहीत, तर त्याला ठार मारण्यात येईल, अशा आशयाचा निनावी संदेश मंगळवारी मुंबई वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून त्याबाबत तपास सुरू केला आहे. यापूर्वीही मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन डेस्कवर सलमानला धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता आणि पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी जमशेदपूर येथून एका व्यक्तीला अटक केली होती.
दरम्यान, सलमान खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी नोएडा येथून एकाला अटक केली. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी सलमान खानला ठार मारण्याचा कट बिश्नोई टोळीने रचला असल्याची योजना उघड केली होती, त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी बिश्नोई टोळीकडून घराबाहेर गोळीबार
सलमान खानला यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात याच टोळीच्या सदस्यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबारही केला होता.