
सलमान खानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'बद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे अभिनीत या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील 'नयो लगदा' आणि 'बिल्ली बिल्ली' ही गाणी प्रदर्शित झाली असून, या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी 'किसी का भाई किसी की जान'मधील 'जी रहे थे हम' या तिसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर रिलीज केला, ज्याला पाहून सिनेरसिक या गाण्याच्या संपूर्ण व्हिडिओची आतुरतेने वाट होते. अशातच, 'जी रहे थे हम' हे गाणे अखेरीस दर्शकांच्या भेटीला आले आहे. शब्बीर अहमद यांनी हे गाणे लिहिले असून सलमान खानने गायले आहे.
८ वर्षांपूर्वी जेव्हा अमाल मलिकने संगीतबद्ध केलेले 'मैं हूं हीरो तेरा'हे गाणे सलमान खानने गायले होते तेव्हा हे गाणे रिलीज होताच ब्लॉकबस्टर ठरले होते. अशातच, आता २०२३ मध्ये सलमान खान आणि अमाल मलिक 'किसी का भाई किसी की जान'मधील 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह) या रोमँटिक गण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. तसेच, 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह) या गाण्यामध्ये सलमान आणि पूजा हेगडेची उत्तम ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही पाहायला मिळेल.
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.