समोसेवाला ते 'बिग बॉस १७'चा विजेता

अखेर अटीतटीचाच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरले आहे.
समोसेवाला ते 'बिग बॉस १७'चा विजेता

मुंबई : ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यावेळी टॉप ५ स्पर्धकांमध्ये मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली होती. अखेर अटीतटीचाच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरले आहे.

मुनव्वर फारुकी... बिग बॉसच्या १७ व्या सिझनचा विजेता... पण सामान्य घरातून येणाऱ्या मुनव्वरच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आली. घर चालवण्यासाठी त्याने कधी भांड्याच्या दुकानात काम केलं तर कधी त्याने ग्राफिक्स डिझायनिंगचं काम केलं. पण त्याला त्याच्यातील स्टँड- अप कॉमेडियन सापडला अन् मुनव्वर युट्यूबर झाला. २०२०ला मुनव्वरने आपला पहिला स्टँड-अप शो युट्यूबवर अपलोड केला. अन् त्याच्या या व्हीडिओंना लाखो लोक बघू लागले. लोकांची त्याला पसंती मिळू लागली.

वडिलांच्या कर्जामुळे लहान वयातच मुनव्वरवर शिक्षण सोडून काम करायची वेळ आली. मुनव्वरची आई आणि आजी समोसे उत्तम बनवायच्या अन् मुनव्वर स्वतः एक स्टॉल लावून ते समोसे विकायचा, समोसे तळताना बऱ्याचदा मुनव्वरची बोटं भाजायची, पण त्याचा हा व्यवसाय चांगला चालला. त्यानंतर मुंबईत आल्यावरही मुनव्वरने एका गिफ्ट शॉपमध्ये तसेच एका भाड्यांच्या दुकानात अगदी पडेल ते काम केलं.

३५ दिवसांसाठी तुरुंगवारी

२०२०पासून मुनव्वरने युट्युबवर आपले शो अपलोड करण्यास सुरुवात केली. पॉलिटिक्स इन इंडिया या नावाने त्याने आपला स्टँड-अप व्हीडिओ युट्युबवर अपलोड केला. हा व्हीडिओ हिट झाला आणि त्याचे नाव सगळीकडे पोहचले. त्यानंतर त्याला अनेक स्टेज शो मिळाले. २०२१ मध्ये तो मध्य प्रदेशात शो करत होता, तेव्हा त्याच्यावर धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप झाला. या प्रकरणात त्याला अटक झाली. तो ३५ दिवसांसाठी तुरुंगात राहिली. नंतर त्याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा मुनव्वर फारुकी प्रसिद्धीच्या झोतात आला.'

मुनव्वर फारुकी आहे 'इतक्या' कोटींचा मालक

कॉमेडियन म्हणून नावारुपाला आलेला मुनव्वर लक्झरियस आयुष्य जगतो. तो महागड्या गाड्यांचा शौकिन आहे. त्याच्याकडे केटीएम आरसी २०० ही बाईक आहे. ८.८६ लाखांची मारुती सुझुकी आणि टोयोटा फॉर्च्युनरही त्याच्याकडे आहे. आता बिग बॉस १७चा विजेता ठरल्यानंतर त्याला ह्युंडाई क्रेटा ही महागडी कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरणारा मुनव्वर जवळपास ८ कोटी रुपयांचा मालक आहे. एका कॉमेडी शोसाठी मुनव्वर तब्बल १.५ लाख ते २.५ लाख रुपये मानधन घेतो.

logo
marathi.freepressjournal.in