
संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनित 'वध'या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचे टीझर पोस्टर्सदेखील प्रदर्शित झाले, ज्यामुळे दर्शक या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला असतानाच, 'वध'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
प्रेक्षकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे, पण आता 'वध'या चित्रपटामार्फत संजय मिश्रा एका अनोख्या भूमिकेसह दर्शकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर इतका अनअपेक्षित आहे कि यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या व्यक्तिरेखेत खूपशी निरागसता दिसत असली तरीसुद्धा त्यांची डार्कसाइड ट्रेलरचा एक महत्वपूर्ण भाग आहे.
'वध'बद्दल बोलताना संजय मिश्रा यांनी सांगितले की, "एक अभिनेता म्हणून मी अशा पात्राची कल्पनाही केली नव्हती, तीही नीनाजींसोबत. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे." तर नीना गुप्ता यांनी म्हंटले की, "'वध'ही एक अतिशय मनोरंजक थ्रिलर कथा आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी चांगला वेळ घालवला. कथा जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने आकर्षक आहे. आणि प्रेक्षक ट्रेलर तसेच चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील."
'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.