
बॉलिवूडचे एक दिग्गज विनोदवीर अभिनेते, आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे अकाली निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ट्विट केली.
७ तारखेला होळीदिवशी सतीश कौशिक यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रंगपंचमीचा तूफान आनंद लुटला होता. त्यांनी या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. जावेद अख्तर यांनी आयोजित केलेल्या होळीच्या कार्यक्रमामध्ये ते अखेरचे दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावली. गाडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
प्रसिद्ध अभिनेता अनुपान खेर यांनी भावनिक ट्विट करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विटमध्ये म्हणाले की, "मला माहीत आहे, मृत्यू हे या जगातले अंतिम सत्य आहे. पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल लिहेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. सतीश आता तुझ्याशिवाय माझे आयुष्य पूर्वीसारखे कधीच राहणार नाही. ओम शांती."