

अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला, पारंपरिक बैठकीची लावणी आणि संगीत बारीच्या समृद्ध वारशाला आपल्या नृत्याने सजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचे मंगळवारी (दि. २२) वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सुरू असलेली त्यांची प्रदीर्घ झुंज त्यांची अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि लावणी क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शकुंतलाताईंचा जन्म १९६० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई छबूबाई नगरकर याही त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच लावणीचा वारसा लाभलेल्या शकुंतलाताईंनी अवघ्या १२ व्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. १९७४ मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबागच्या ‘हनुमान थिएटर’मध्ये त्यांच्या लावणीचा प्रवास खऱ्या अर्थाने बहरला. अनेक दशके त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि अदाकारीने रसिकांच्या मनावर राज्य केले.
शकुंतलाताईंनी केवळ पारंपरिक शैलीवर अवलंबून न राहता कथक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. यामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. पारंपरिक मंचासोबतच त्यांनी ‘लावणी के रंग’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यासारख्या आधुनिक प्रयोगांद्वारे नव्या पिढीपर्यंत लावणी पोहोचवली. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेत शासनाने व विविध संस्थांनी त्यांना प्रतिष्ठित ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’, २०१८ मध्ये ‘मुंबई महापौर पुरस्कार’ आणि २०२३ मध्ये ‘नाट्य गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.