
'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी ती हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआड गेली. तिच्या आकस्मिक निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शेफालीने एका मुलाखतीमध्ये ''माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणूनच मला ओळखलं जावं'' अशी इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा अखेर खरी ठरली.
गुरुवारी (२७ जून) रात्री शेफालीची तब्येत अचानक बिघडली. रात्री ११ च्या सुमारास तिच्या छातीत दुखू लागल्याने पती पराग त्यागीने तिला तात्काळ बेलेव्ड्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
२००२ साली आलेल्या ‘काटा लगा’ या गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. यानंतर ‘नच बलिए’, ‘बिग बॉस १३’ यांसारख्या रिअॅलिटी शो मधून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्पष्टवक्तेपणा, स्टाईल आणि शांत स्वभावामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली होती.
''जगात एकच काटा लगा गर्ल... ती मीच''
दरम्यान, शेफालीचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात ती अभिमानाने म्हणते, "माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणूनच मला ओळखलं जावं... जगात एकच 'काटा लगा गर्ल', आणि ती मीच." तिचा हा आत्मविश्वास आणि शैली शेवटी खरी ठरली.
बिग बॉस १३चे दोन तारे… आता फक्त आठवणीत
शेफाली जरीवालाने ज्या ‘बिग बॉस १३’ सीझनमध्ये भाग घेतला होता, त्याच सीझनमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाही होता, जो त्या सीझनचा विजेता ठरला होता. आता दोघंही आपल्यात नाहीत. सिद्धार्थचं २०२१ मध्ये अवघ्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि आता शेफालीनेही ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एकाच मंचावर चमकलेले हे दोन तारे… दोघांचेही आयुष्य हृदयविकाराने चाळीशी नंतर अचानक संपले. प्रेक्षकांसाठी ‘बिग बॉस १३’ आता केवळ टीव्हीवरील एक रिअॅलिटी शो न राहता, दोन अपूर्ण कथांची आठवण ठरत आहे.