काही दिवसांपूर्वी बिग बॉस १६चा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी सगळ्यांना शिव ठाकरे हा विजेता होणार असे वाटत असतानाच एमसी स्टॅनला या सीजनचा विजेता घोषित केले. त्यानंतर उपविजेता ठरलेल्या मराठमोळा शिव ठाकरेच्या चाहत्यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली होती. यासर्व प्रवासाबद्दल आणि निकालाबद्दल पहिल्यांदाच शिव ठाकरेने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, माझ्या नशिबात काही वेगळे लिहिलेले असावे. मी खुश आहे की माझ्या मित्रानेच विजेतेपद पटकावले." असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तो पुढे म्हणाला की, "मी जेव्हा पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरात गेलो, तेव्हाच ठरवले होते की अखेरपर्यंत घरात टिकून रहायचे. जेंव्हा तुम्ही मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला लक्ष केले जाते, पण आपण त्या सर्वांची वाट लावून अंतिमपर्यंत पोहोचलो." असे म्हणत त्याने टीका करणाऱ्यांना टोलाही लगावला. चाहत्यांनी दाखवलेल्या नाराजीवर तो म्हणाला की, "प्रेम करणारे लोकं असतात त्यांना वाईट वाटतच. पण ती ट्रॉफी कोणाला तरी एकालाच मिळते. माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, ते माझ्यावर प्रेम करत होते आणी मी तिथेच जिंकलो. बिग बॉस बद्दल मला खूप आदर आहे, मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.