मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता म्हूणन नागराज मंजुळे याचं नाव कायम आघाडीवर असतं. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटातून त्याचं काम सिद्ध करून दाखवलं आहे. नागराज मंजुळे फक्त उत्तम दिग्दर्शकच नाही तर तितकेच प्रभावी अभिनेते देखील आहेत.
नागराज मंजुळेंनी आजपर्यंत फँड्री, सैराट, नाळ, झुंड, घर बंदूक बिरयाणी अशा अनेक चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्यांच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'नाळ 2' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता नागराज मंजुळे त्यांच्या येणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नागराज मंजुळे आता एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.
कायम सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या नागराज यांनी काही दिवसांपुर्वी त्यांच्या आगामी 'खाशाबा' या चित्रपटाची घोषणा केली होती. आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत त्यांनी या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केल्याचं सांगितले आहे. छत्रपती शिवरायांच्या फोटोचं पुजन करुन चित्रपटाच्या टिमने शुटिंगला सुरुवात केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'चांगभलं!' असं लिहिलं आहे.
सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी नागराजला त्याच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा देखील देत आहेत. तर अनेकांनी या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच याबाबतची घोषणा होईल, अशी चाहत्यांना आशा लागून आहे.