मराठी सिनेसृष्टीतील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'या' व्यक्तीचं निधन, उत्कर्षची भावुक पोस्ट

गायक आनंद शिंदे यांचे भाऊ दिनकर शिंदे यांचे निधन झाले असून त्यांचा पुतण्या आणि गायक उत्कर्ष शिंदे याने काकांच्या निधनाबाबत भावुक पोस्ट लिहिली.
मराठी सिनेसृष्टीतील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'या' व्यक्तीचं निधन, उत्कर्षची भावुक पोस्ट
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायक आनंद शिंदे यांचे भाऊ दिनकर शिंदे यांचे निधन झाले असून त्यांचा पुतण्या आणि गायक उत्कर्ष शिंदे याने काकांच्या निधनाबाबत भावुक पोस्ट लिहिली. मराठी चित्रपट सृष्टीतील गायन क्षेत्रात शिंदे कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र दिनकर यांनी आपल्या वडिलांच्या गायनाचा वारसा पुढे चालवला होता.

गायक दिनकर शिंदे यांनी आंबेडकरी गीतांसह माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दिनकर शिंदे यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांना त्यांच्या युट्युब चॅनेलवर लाखांच्या घरात व्ह्यूज आहेत. तसेच दिनकर शिंदे यांनी भाऊ आनंद शिंदे यांच्यासह अनेक गाणी रचून ऐंशी आणि नव्वदचा काळ गाजवला. यातील अनेक गाण्यांच्या सीडीजची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती. दिनकर शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच लोकगीतांमध्ये बहुमूल्य योगदान दिले होते.

गायक उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "(गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे) महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव,आनंद मिलिंद शिंदेंचे( दिनू) धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदे चे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद, उत्कर्ष, आदर्शचे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराच आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार. मी नेहमी माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहान पणीचे किस्से ऐकले. कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर रहाचे, एकाच शाळेत शिकायचे. लहानपण कसं एकत्र गेलं. कसं लहानपणीच मम्मी पप्पांचं लग्न झालं. गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला. गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली. कसा शिंदे घराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला. मोठा भाऊ म्हणजे बापच आणि वहिनी म्हणजे आई .हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावाने अजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्या कडून शिकलो".

उत्कर्ष दिनकर यांनी दिलेल्या संस्काराबबाबत बोलताना म्हणाला, "आज जेव्हा मी माझे पुतणे आल्हाद ,अंतरा, आलाप यांना खांद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यांवर घेऊन वाढवलत. तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आणि तिही आपली मुलच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. शिंदे घराण्याने काय कमवल असेल तर ते असतील नाती, माणसे, मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग".

मराठी सिनेसृष्टीतील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'या' व्यक्तीचं निधन, उत्कर्षची भावुक पोस्ट
Jackie Shroff: सर्वांवर होईल कारवाई, फक्त कृष्णा अभिषेकला मिळाली सूट! जग्गूदादाची मिमिक्री करु शकतो कॉमेडियन

उत्कर्ष पुढे त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, "मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत .एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलित .नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुष्याशी भिडण्याची कला शिकवून गेला. भावाभावातल प्रेम. स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू. तुम्हा सर्वांच्या संस्कारामुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वटवृक्ष आणखीन जास्त भव्य समृद्ध करू.तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणा पासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना आम्ही तुम्हाला खूप मिस करू". गायक दिनकर शिंदे यांच्या जाण्याने मराठी कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

logo
marathi.freepressjournal.in