वांद्रे गोळीबारप्रकरणी सलमान, अरबाज खानची जबानी नोंदवली

वांद्रे येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी खान बंधूची गुन्हे शाखेकडून सुमारे सहा तास जबानी नोंदविण्यात आली आहे.
वांद्रे गोळीबारप्रकरणी सलमान, अरबाज खानची जबानी नोंदवली
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : वांद्रे येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी खान बंधूची गुन्हे शाखेकडून सुमारे सहा तास जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यात सलमान सलीम खान आणि अरबाज सलीम खान यांचा समावेश असून, गुन्हे शाखेचे एक पथक त्यांच्या घरी जबानी नोंदविण्यासाठी गेले होते. या गुन्ह्यांत सलमानची जबानी महत्त्वाची असून, आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

१४ एप्रिलला सलमान खान याच्या घराजवळ लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोईच्या इशाऱ्यावरून दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सुरतच्या भूज, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब येथून सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात हरपाल सिंग, मोहम्मद रफिक चौधरी, विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. त्यापैकी अनुजकुमार थापन याने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उर्वरित पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या पाचही आरोपींचा गोळीबारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. त्यात गुन्ह्यांत वापरलेल्या बाईकसह पिस्तूल, काडतुसे, मॅगझीनसह इतर वस्तूचा समावेश आहे. या गुन्ह्यांत सलमान खान हा मुख्य साक्षीदार आहे. त्यामुळे त्याची जबानी नोंदविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते; मात्र सलमान सतत शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याची जबानी नोंदविण्यात आली नव्हती. अखेर सलमानने गुन्हे शाखेला त्याच्या घरी जबानी नोंदविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर पोलीस पथक त्याच्या घरी गेले होते. यावेळी सलमानसह त्याचा भाऊ अरबाज खान याची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली आहे. जवळपास सहा तास ही जबानी घेण्यात आली होती. सलमानला यापूर्वी कधी धमक्या आल्या होत्या, त्याच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती का, धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव काय सांगितले होते, त्याची खासगीसह पोलीस सुरक्षेबाबत विचारणा करण्यात आली होती. गोळीबाराच्या वेळेस सलमान हा त्याच्या घरी होता. सलमान आणि अरबाज खान यांचे जबाब लवकरच मोक्का न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in