मराठीत 'सूर्या' करणार अॅक्शन ; नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला

२७ डिसेंबरला आगामी 'सूर्या' या मराठी सिनेमाचे कलाकार प्रसाद मंगेश आणि अभिनेत्री रुचिता जाधव यांनी 'नवशक्ति'च्या कार्यालयाला भेट दिली
मराठीत 'सूर्या' करणार अॅक्शन ; नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला

"हा चित्रपट म्हणजे माझे वडील मंगेश ठाणगे यांचे एक स्वप्न होते. दुर्दैवाने सिनेमाचे सर्व काम संपले आणि आजाराने त्यांचे निधन झाले. पण, त्यांचे मराठीमध्ये अ‍ॅक्शन सिनेमा करण्याचे एक स्वप्न होते, ते त्यांनी पूर्ण करून दाखवले. हा सिनेमा करताना अनेक अडचणी आल्या; मात्र त्यावर मात करत हा सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, याचा खूप मोठा आनंद आहे." अशा भावना आगामी 'सूर्या' सिनेमाचा अभिनेता प्रसाद मंगेशने व्यक्त केल्या. मंगळवार, २७ डिसेंबरला आगामी 'सूर्या' या मराठी सिनेमाचे कलाकार प्रसाद मंगेश आणि अभिनेत्री रुचिता जाधव यांनी 'नवशक्ति'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सिनेमाशी संबंधित अनेक किस्से नवशक्तिच्या टीमशी शेअर केले.

राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा ‘सूर्या’  हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट २०२३ या नव्या वषार्तील पहिल्या आठवड्यात ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसाद मंगेश सोबत रुचिता जाधव, अखिलेंद्र मिश्रा, हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव,  देवशी खांधुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

वडिलांचे स्वप्न पूर्ण केले : प्रसाद मंगेश

"सुरुवातीला वडिलांना हवा तसा कलाकार या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी मिळत नव्हता. त्या कालावधीमध्ये मी जीम वगैरे करत होतो, त्यांना माझ्यामध्ये या सिनेमातला सूर्या दिसला. त्यांनी मला घेऊन हा सिनेमा करण्याचा निर्धार केला. या सिनेमाचे वडिलांनी पहिले दोन ड्राफ्ट पाहिले होते. पहिला ड्राफ्ट पाहिला तेव्हा, माझ्या एंट्रीला त्यांनी शिट्टीच मारली. कारण, त्यांना हवा असलेला 'सूर्या' त्यांना पाहायला मिळाला होता. ही सर्वात मोठी कौतुकाची थाप होती," असा भावनिक किस्सा प्रसादने यावेळी सांगितला.

'हा' चित्रपट अ‍ॅक्शनपटांसाठी बेंचमार्क ठरेल : रुचिता जाधव

अभिनेत्री रुचिता जाधव म्हणाली की, "या सिनेमामध्ये काम करताना आम्ही सर्वानीच धमाल केली. ती तुम्हाला पडद्यावरही दिसेल. यामध्ये जरी एक लव्ह स्टोरी असली, तरीही हा एक मसाला, अ‍ॅक्शनपट अधिक आहे. माझ्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, जशी मी खऱ्या आयुष्यात आहे तशीच ही भूमिका आहे. खरं सांगायचं झालं, तर मराठीमध्ये असे अ‍ॅक्शनपट खूप कमी आले आहेत. हा सिनेमा नक्कीच मराठीमध्ये अ‍ॅक्शनपटांसाठी एक बेंचमार्क ठरेल." अशा भावना तिने व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in