
दुर्ग : अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्लाप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एका संशयिताला छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून शनिवारी ताब्यात घेतले. या संशयिताचे नाव आकाश कैलाश कन्नोजिया (३१) असे असून तो मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते कोलकाता शालीमार दरम्यान धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने प्रवास करत होता, असे आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले.
दुपारी साधारणपणे १२.३० वाजता, आरपीएफ पोस्ट दुर्गला मुंबई पोलिसांकडून सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. त्याच्या मोबाइल फोनचे स्थान आणि छायाचित्र देखील शेअर करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आरपीएफ दुर्गने मुंबई-हावडा मार्गावर दुर्गच्या आधी असलेल्या राजनांदगाव स्थानकावर आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. मात्र, ट्रेन थांबल्यानंतरही संशयिताचा थांगपत्ता लागला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दुर्ग स्थानकावर दोन पथके तयार ठेवली होती. गाडी आल्यानंतर संशयित सर्वसाधारण डब्यात जनरल डब्यात सापडला, असे त्यांनी सांगितले. त्याचा फोटो मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला आणि त्यांनी त्याची ओळख पटवली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अभिनेता सैफ अली खानच्या इमारतीत जिन्याने खाली जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. मुंबई पोलिसांची एक टीम सायंकाळी विमानाने रायपूरला पोहोचून त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते. त्यानंतरचे त्याचे वांद्रे व दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे.
घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेनंतर हल्लेखोर दादर येथे गेला आणि कबुतरखाना परिसरातून एका मोबाइल दुकानातून हल्लेखोराने हेडफोन्स खरेदी केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा आणि पोलिसांनी संबंधित दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दुकान मालकाची चौकशी केली. मात्र, दुकान मालकाला हल्ल्याबाबत काही माहिती नव्हती.
करिनाचे निवेदन
पोलिसांनी घटनेनंतर करिनाचे निवेदन नोंदवले. करिनाच्या म्हणण्यानुसार, घुसखोर सैफसोबत झालेल्या झटापटीत खूप आक्रमक झाला आणि त्याने त्याच्यावर अनेक वेळा वार केले. मात्र, घरी उघड्यावर ठेवलेले दागिने अथवा अन्य चीजवस्तूंना त्याने स्पर्शही केला नाही. सैफचे निवेदन अद्याप नोंदविण्यात आलेले नाही.