सध्या देशात चित्रपटांवरून वाद होण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशात 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन बरचं घमासान पाहायला मिळालं. हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. अशात आता अभिनेता रणदीप हुडा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे. विनायक दोमोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत असलेला या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडाने मुख्य भूमिका साकारली असून या सिनेमाचे दिग्दर्शन देखील त्यानेचं केलं आहे. या सिनेमाच्या टॅगलाईनमध्ये केलेल्या दाव्यानं हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. या टॅगलाईनमध्ये सावरकरांनी भगत सिंग, सुभाषचंद्र बोस आणि खुदीरम बोस यांच्यासारख्या स्वातंत्र्यसेनानींना प्रेरित केल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनं यावर आक्षेप घेतला आहे.
असे दावे करुन चित्रपटाची प्रसिद्धी करण्याच्या विरोधात असल्याची भूमिका स्वस्तिकाने मांडली आहे. रणदीप हुडाच्या चित्रपटाविषयी ट्विट करत स्वस्तिका म्हणाली की, "खुदीराम बोस यांचं वयाच्या 18 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यांना स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्याआधीच प्रेरित करण्यात आलं होतं का? आणि नेताजी यासाठी नेताजी बनले का कारण त्यांना कोणापासून प्रेरणा मिळाली होती? भगत सिंग यांचा इतिहास आपल्याला आधीपासूनच माहीत आहे. जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून अशा प्रेरणादायी कथा शोधून काढल्या जात आहेत?" याबाबत दुसरे ट्विट करत तिने म्हटलं की, "सावरकर हे खुदीराम यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. खुदीराम यांचं निधन 1908 मध्ये झालं होतं. सावरकरांनी त्यांचं 1857 वरील पुस्तक 1909 मध्ये प्रकाशित केलं होतं. तेव्हा ते लंडनमध्ये विद्यार्थी होते. मी चुकत असेन तर मला सांगा." असे तिने म्हटलं आहे.
याविषयी पुढे बोलताना स्वस्तिका म्हणाली की, "मला वाटतं की स्वातंत्र्यसैनिकांचा किंवा आपल्या देशासाठी लढलेल्यांचा कोणाचाही अनादर किंवा अपमान करु इच्छित नाही. माझा असा कोणताच हेतू नाही. पण चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेली ही गोष्ट मला मान्य नाही. एखाद्या व्यक्तीला निवडून त्याला इतरांपेक्षा वरच्या स्थानावर ठेवणं गरजेचं नाही", असं स्वस्तिकाने म्हटलं आहे.
'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुडासोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. स्वस्तिकाने केलेल्या ट्विटवर रणदीप हुडाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रणदीप हूडाकडून यावर आता कोणती प्रतिक्रिया येते, ते पाहण महत्वाचं ठरणार आहे.