
टीव्ही कलाकार तुनिषा शर्माने २०व्या वर्षी मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केली. यानंतर सिनेसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली. यासंदर्भात तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली असून आता या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. अशामध्ये आता तिचे मामा पवन शर्मा यांनी या प्रकरणामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. १० दिवसांपूर्वी तुनिषा नैराश्यात गेली होती. तिची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते.
तुनिषाचे मामा पावन शर्मा यांनी एएनआयला सांगताना म्हणाले की, "कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शिझान आणि तुनिषा एकमेकांच्या अतिशय जवळ होते. १० दिवसांपूर्वी तिला पॅनिक अटॅक आला होता. यामुळे तिला रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले होते. जेव्हा मी आणि तिची आई तिला भेटण्यास गेलो होतो, तेव्हा तिने तिच्यावर अन्याय झाला असून तिची फसवणूक झाल्याचे आम्हाला सांगितले. त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची आम्हाला शंका आली. जो दोषी आहे,त्याला शिक्षा व्हायलाच हवी, अशी आमची मागणी आहे." दरम्यान, तुनिषासोबत प्रेमसंबंध असताना त्याचे बाहेरही संबंध होते. तसेच, ही गोष्ट तिला कळले होते. अशी माहिती देण्यात येत आहे.