निर्माते, दिग्दर्शक विश्वास जोशी यांचा 'फुलराणी' हा चित्रपट येत्या २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये 'फुलराणी'च्या भूमिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर दिसणार आहे. तर, सुबोध भावे, दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, मिलिंद शिंदे अशी तंगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. अशामध्ये आज चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी, अभिनेते मिलिंद जोशी आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी 'नवशक्ती'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट कुटुंबासोबत चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा, असे आवाहन केले. तसेच, त्यांनी या चित्रपटाचा प्रवास आपल्या मुलाखतीमध्ये मांडला आहे.
‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४मध्ये आलेला ‘माय फेअर लेडी’ हा संगीतमय चित्रपट चांगलाच गाजला. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रियदर्शनी इंदलकर ही कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता तांडेलची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेता सुबोध भावेने विक्रम राजाध्यक्ष ही भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, सुशांत शेलार, अश्विनी कुलकर्णी, गौरव घाटणेकर आणि गौरव मालणकर हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री. ए. राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले असून गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची आहेत. यामध्ये संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.