'थलपती विजय'ची राजकारणात होणार एण्ट्री! तामिळनाडूत नव्या पक्षस्थापनेची प्रक्रिया सुरू

नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी विजय यांची निवड करण्यात आली असून पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
'थलपती विजय'ची राजकारणात होणार एण्ट्री! तामिळनाडूत नव्या पक्षस्थापनेची प्रक्रिया सुरू
Published on

नवी दिल्ली : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय राजकारणात एण्ट्री घेणार असून राजकीय पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी विजय यांची निवड करण्यात आली असून पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पक्षनोंदणीआधी झालेल्या बैठकीत पक्षाच्या जनरल काऊन्सिलचे २०० सदस्य उपस्थित होते. केंद्रीय कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून पक्षाच्या सरचिटणीसांची आणि खजिनदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे नाव आणि निवडणुकीसंदर्भात अन्य बाबी ठरवण्याचे अधिकार कार्यकारिणीने अध्यक्ष विजय यांना बहाल केले आहेत. थलपती विजय यांच्या पक्षाने २०२६ साली होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

पक्षाचे नाव काय असेल हे जरी आता सांगता येत नसले तरी तामिळनाडूची परंपरा लक्षात घेता, त्यात कळघम या शब्दाचा समावेश मात्र नक्की असेल, असे स्पष्ट करण्यात आले. विजय यांना तमिळ चित्रपटसृष्टीचा नवा रजनीकांत मानले जाते. रजनीकांत यांच्याएवढीच किंवा त्यांच्यानंतर त्यांचीच सगळ्यांत जास्त राज्यात लोकप्रियता असून त्यांनी आतापर्यंत ६८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या किमान एक दशकापासून ते राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यतेची चाचपणी करत होते, असेही बोलले जाते.

विजय यांचा प्रचंड चाहतावर्ग असून त्यांच्यामार्फत गरीबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यात अन्नधान्य वाटप, शिष्यवृत्ती, ग्रंथालय, सायंकाळचे वर्ग आणि कायदेशीर मदत आदींचा समावेश आहे. अलीकडेच त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या उमेदवारांच्या सन्मानासाठी मतदारसंघनिहाय कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

विजय यांची केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही प्रचंड लोकप्रियता असून त्यांच्या विविध चित्रपटांत अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विषयांना हात घातलेला असतो. सरकारला लक्ष्य करण्यासाठी काही वेळा त्यांच्या चित्रपटांनी अत्यंत वादग्रस्त भूमिका घेतली असल्याचेही आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in