अभिनेत्रीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक

पीडित महिला ही एक अभिनेत्री असून, हिंदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत.
अभिनेत्रीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक

बॉलीवूड अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका वाँटेड आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. राहुल उर्फ ​​हर्ष ज्योतिंद्र व्यास असे आरोपीचे नाव असून, शनिवारी सत्र न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिला ही एक अभिनेत्री असून, हिंदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. दरम्यान, राहुल हा दरोडा आणि खंडणीच्या आणखी एका गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून, गेल्या पाच वर्षांपासून तो फरार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर ओशिवरासह आंबोली, कांदिवली आणि गुन्हे शाखेत अनेक गुन्हे दाखल आहेत.

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२१ मध्ये अंधेरीतील एका जिममध्ये पीडितेची राहुल उर्फ ​​हर्षशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे चांगले मित्र बनले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून राहुलने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती गरोदर राहिली; मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तेथून पळ काढला. राहुलने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच अभिनेत्रीने ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक, शिवीगाळ करून मारहाण, जीवे मारण्याची धमकी या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

त्याचा शोध घेत असताना तो अंधेरीतील वीरा देसाई रोड येथील फिटनेस फर्स्ट जिमजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन जाधवर यांच्या पथकाने राहुलला अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली असून, पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे सांगितले.

ओशिवरा येथील एका संगणक प्रशिक्षकाच्या कार्यालयात सहा ते सात जणांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसून शिक्षकाला त्याच्या कर्मचाऱ्यांसह मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करून कार्यालयातील रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य घेऊन ते पळून गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी या सात जणांविरुद्ध दरोडा, खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

logo
marathi.freepressjournal.in