नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी -उदय सामंत

पिंपरी-चिंचवडला होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलनाच्या मोरया संमेलनस्थळी पोहचल्यावर अजूनही सभामंडपाची तयारी सुरूच होती

संजय कुळकर्णी/मुंबई 'गेल्या दोन वर्षांत राजकारणात होतं नाही तेवढा संघर्ष नाट्य परिषदेत झाला. पक्षात मतभेद असतात. सांस्कृतिक क्षेत्रात ते नसावेत. त्यामुळे सांस्कृतिक चळवळ ही पुढे जाईल. तसेच विक्रम गोखले यांनी जो पाच कोटींचा भूखंड पुणे नाट्य शाखेला दिलेला आहे. मी आश्वासन देतो की, रत्नागिरी नाट्य संमेलन समारोपला रत्नागिरीत त्याचे भूमिपूजन केले जाईल' अशी ग्वाही उद्योग मंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत दिली. या विभागीय संमेनाच्या शुभारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय होता.

ढोल-ताशांच्या गजरात बालगंधर्व ते गणेश क्रीडा संकुल निघालेली शोभायात्रेचे १००व्या नाट्य संमेलनाचे पुणेकरांना आकर्षण वाटले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज भोसले, दीपक रेगे, विजय जोशी हे मान्यवर शोभयात्रेत आघाडीवर होते.

शोभयात्रा ही बालगंधर्व रंगमंदिरातून निघाली होती. त्यात ५०० दुचाकी, १० रथांवर ज्येष्ठ रंगकर्मी, त्यांनी साकारलेल्या नाटकातील १०० व्यक्तिरेखा हे सर्व नाट्य रसिकांना आकर्षित करणारे होते. रंगकर्मींचा सहभाग मोठा होता. या नाट्य संमेलनाचा शुभारंभ रंगमंचाचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी तिसरी घंटा देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

उदय सामंत यांनी त्यांच्या भाषणात नाट्य परिषदेला खडेबोल सुनावले. त्यांच्या मते, यापुढे नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी प्रशांत दामले यांनी पुढाकार घ्यावा, हे स्पष्टपणे व्यक्त केले. नाट्य संमेलनाला तीन दिवस तरी निर्मात्यांनी नाटकं करू नये. कारण कलाकारांच्या दिंडीत कलाकारांना पाहण्यासाठी रसिक येतात. त्याचाही विचार प्रशांत दामले यांनी पुढच्या नाट्य संमेलनात करावा, अशी विनंती केली. या सोहळ्यात ९९ नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी, मी अजूनही संमेलनाध्यक्ष आहे माजी नाही, असे बोल शुभारंभ सोहळ्यात आयोजकांना सुनावले.

माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, सुरेश खरे, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य परिषदेचे विश्वस्त यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यासाठी रसिकांची उपस्थिती चांगली होती.

पिंपरी-चिंचवडला होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलनाच्या मोरया संमेलनस्थळी पोहचल्यावर अजूनही सभामंडपाची तयारी सुरूच होती. मोरया गोसावी क्रीडा संकुलमध्ये कार्यकर्ते दुपारी दिसत नव्हते. पुण्याला नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमाला गेलेत असं कळलं. पत्रकारांच्या स्वागतासाठी कुणीही नव्हतं ही खटकणारी बाब होती. सभास्थळापासून जेवणाची सोय तशी लांबच. एक सुखद बाब ही पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमार साकला या व्यक्तींची मधुर वाणी फारच आवडली बुवा. भाऊसाहेब भोईर यांचे ते अगदी जवळचे. संमेलनास येणाऱ्या सर्वांची जबाबदारी भाऊसाहेबांनी त्यांच्यावर टाकलेली. सहज बोलता बोलता ताक आणि टाक यातील फरक त्यांनी त्यांच्या मधाळं वणीने सांगितला. आता त्याची आठवण या पुढच्या प्रत्येक संमेलनात येणारचं.

पिंपरी-चिंचवड शाखेने यापूर्वीची संमेलन हिट करून दाखवली आहेत. त्यांच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात लता मंगेशकर, आशा भोसले, अनेक मराठी हिंदी सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. त्या शाखेला यंदाचे १००वे नाट्य संमेलन साजरे करण्यास मिळतेय याचा राजेंद्र कुमार साकला यांना अभिमान आहे. सहज गमतीने त्यांना विचारले भाऊसाहेब भोईर कुणाच्या गटातील? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी कटाक्षाने टाळले. विचारलं शरद पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी बसणार का? त्यावेळी ते म्हणाले,'तुम्ही संध्याकाळी पाहाल की.' नाट्य परिषदेच्या शाखेचे सर्व पक्षाबरोबर चांगलेच संबंध आहेत. शेवटच्या दिवशी रंगमंचावर त्याचे दर्शन होईल, असे साकला म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in