भारताकडून यंदाच्या ऑस्करसाठी (Oscar 2023) पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे कांतारा, गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये 'मी वसंतराव' या चित्रपटाचादेखील समावेश करण्यात आला आहे. 'मी वसंतराव' हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये त्यांची मुख्य भूमिका ही राहुल देशपांडे याने साकारली होती. तसेच, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, सारंग साठे, अनिता दाते, यतीन कार्येकर या कलाकारांनी काम केले आहे.
'द काश्मीर फाईल्स'मध्ये अभिनय केलेल्या पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे.
तसेच, कांताराला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर, यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या रिषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची अंतिम यादी २५ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे.