New Marathi Movie: रेड्याने जुळवली लग्नगाठ! आगळीवेगळी प्रेमकथा लवकरच येणार रुपेरी पडद्यावर

Gaabh: ‘गाभ’ या आगामी चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर लवकरच झळकणार आहे.
Another love story will soon hit the silver screen

Kailas Waghmare & Saily Bandkar: असं म्हणतात की,‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ मात्र ‘गाभ’ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीमगाठ चक्क एका रेड्याने जुळवली आहे. चित्रपटातील दादू (कैलास वाघमारे) आणि फुलवा (सायली बांदकर) या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी २१ जूनला येणाऱ्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.

‘गाभ’ चित्रपटातील कैलासचा रोमँटिक अंदाज त्याच्या ‘दादू’ या व्यक्तिरेखेतून पहायला मिळणार आहे. ‘या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून चित्रपटातील आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल’, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. चित्रपटात या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्याची गावच्या रांगड्या मातीच्या पार्श्वभूमीवरील ‘ गाभ’ ही कथा आपल्याला नक्कीच भावेल. २१ जूनला ‘गाभ’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in