अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली आहे. यात प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नवनिर्वाचीत अध्यक्ष असेल्या प्रशांत दामले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सामाज माध्यमांवर या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे राजकारण एखाद्या राजकिय निवडणुकीप्रमाणे तापताना दिसत होते. प्रशांत दामले यांनी बाजी मारल्यानंतर या निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. यानंतर प्रशांत दामले यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दामले यांच्यासोबत अजित भुरे तसेच नवनिर्वाचीत सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशांत दामले यांचे अभिनंदन केले. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर दामले यांनी "हे सरकार ऐकणारं सरकार आहे." असे म्हटले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रशांत दामले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत. शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त असल्याने दामले हे आता पवार यांची देखील भेट घेणार आहेत.
या निवडणुकीआधी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांची अध्यक्षपदाच्या चर्चेसंदर्भात भेट घेतली होती. यावेळी प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाला शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी पवार म्हणाले होते, "जेष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले आहे. पॅनलमधील विजयी झालेल्या सदस्यांनी आज मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते." असे ट्विट पवार यांनी केले होते.