“काश्मीर हे अव्यक्त काव्य; हे प्रत्येकाच्या आत्म्यावर कोरलेलं असतं!”- अनुपम खेर

माझ्या भावना आणि अभिनय हे एक झाले. अनेकदा असं घडलं की प्रसंगाचं चित्रीकरण पार पडल्यावर मी आणि विवेक मॉनिटरवर तो प्रसंग पाहात असू आणि तेव्हा आमच्या भावना उचंबळून येत
“काश्मीर हे अव्यक्त काव्य; हे प्रत्येकाच्या आत्म्यावर कोरलेलं असतं!”- अनुपम खेर
ANI

कथा एक, अब्जावधी भावना- ‘दि काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला या वर्षीचा सर्वाधिक चर्चित असा चित्रपट बनविण्यात याच गोष्टींचा वाटा सर्वात मोठा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने लक्षावधी लोकांच्या मनाची तार छेडली. ज्यांना रातोरात आपले घर सोडून आपल्याच देशाच्या इतर भागात निर्वासित म्हणून राहावे लागले, त्यांच्या या व्यथेला आवाज दिला असून ‘द काश्मीर फाइल्स’ने त्यांच्या या भावना अचूकतेने व्यक्त केल्या आहेत. येत्या 25 जून रोजी रात्री 8.00 वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित केला जाईल. या कलाकृतीसंदर्भात नामवंत अभिनेते अनुपम खेर यांनी आपली मते व्यक्त केली आणि आपल्या बालपणीच्या काही आठवणीही सांगितल्या.


काश्मीरमध्ये चित्रीकरण करीत असताना बालपणीच्या काही स्मृती जाग्या झाल्या का?
काश्मीर हे अव्यक्त काव्य आहे, ते आमच्या आत्म्यावर कोरलं गेलं आहे. या चित्रपटासाठी पुन्हा काश्मीरमध्ये जाणं हा जीवन बदलून टाकणारा अनुभव होता. माझ्या मनात काश्मीरच्या आठवणी अगदी ताज्या होत्या, पण ही गोष्ट मलाच ठाऊक नव्हती. हंडवारा आणि सोपोरमधील सुंदर माळरानं, खीर भवानी, निशाद गार्डन्स आणि जगातील सर्वात मंत्रमुग्ध करणारी जागा असलेलं दल सरोवर- यांना आम्ही दिलेल्या कौटुंबिक भेटी यांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला अजूनही आठवतंय, बारामुल्लाच्या चेरी आमच्या घरी एका छोट्या खिडकीतून कशा पाठविल्या जात, हेही मला आठवतंय. मी जगातील बहुतेक सर्व निसर्गरम्य स्थळांना भेटी दिल्या आहेत, तरी मी म्हणेन की जगात जर कुठे सौंदर्य असेल तर हमीनस्तु, हमीनस्तु (ते इथेच आहे).


या चित्रपटाच्या कथेवरील विवेकच्या दृष्टिकोनावर तुम्ही कसा विश्वास ठेवला?
काश्मीरच्या इतिहासावर चित्रपट तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. दि काश्मीर फाइल्सवरील विवेकचा दृष्टिकोन हा मुक्त करणारा वाटला. मी जेव्हा त्याची पटकथा ऐकली, तेव्हाच मला जाणवलं की मला या चित्रपटाचा भाग बनलंच पाहिजे. हा विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे, हे खरं, पण तिथेच माझ्या भावना आणि अभिनय हे एक झाले. अनेकदा असं घडलं की प्रसंगाचं चित्रीकरण पार पडल्यावर मी आणि विवेक मॉनिटरवर तो प्रसंग पाहात असू आणि तेव्हा आमच्या भावना उचंबळून येत. त्याची हीच अस्सल भावना पाहून मी हा चित्रपट स्वीकारला.


दि काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम का मोडले, असं तुम्हाला वाटतं?
चित्रपट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत; ते आपल्या अनुभवविश्वाला व्यापक करतात आणि आपलं राहणीमान निश्चित करतात. ‘दि काश्मीर फाइल्स’ हा आमच्या भावनांच्या भोवर्‍्याला पटकथेत रुपांतरित करून लोकांना त्या भावनांशी निगडित करून भावनांची लाट निर्माण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता. गेली दोन वर्षं आपण सर्वांनीच फार वाईट काळ अनुभवला आहे, पण वेदना आणि दु:खानेच आपल्याला जवळ आणलं होतं. आपल्या जीवनातील एका अविस्मरणीय काळाकडे पाहण्याची ‘दि काश्मीर फाइल्स’ ही एक खिडकी आहे. मला वाटतं, लोकांना त्यांची पीडा आणि वेदना अचूकपणे कळली. त्यानंतर जगभर भावनांची एक साखळी प्रतिक्रिया उमटत गेली आणि तिनेच या चित्रपटाला उदंड यश दिलं.


तुमच्या सहकलाकारांबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता?

पहिली गोष्ट म्हणजे ‘दि काश्मीर फाइल्स’ चित्रपट बनविल्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा आभारी राहीन. आमच्यासाठी हा अनुभव कसा होता, हे शब्दांत व्यक्त करणं आम्हाला शक्यच नाही. बर्‍्याच वर्षांनंतर पल्लवी आणि मिथुनदा यांच्याबरोबर एकत्र भूमिका करताना मला खूप आनंद झाला. तसंच दर्शनकुमार आणि भाषा सुंबली यांच्याबरोबरही काम करणं हा आनंदाचा अनुभव होता. आम्हाला हा चित्रपट तयार करताना पुन्हा एकवार त्या काळच्या वेदना अनुभवाव्या लागल्या. त्यामुळे हा आम्हा सर्वांसाठीच एक गंभीर अनुभव होता. अनेकदा माझ्या आतील भावना आणि चित्रपटातील भावना यांत फरक करणं शक्य झालं नाही. पण माझ्या सहकलाकारांना आपल्या भूमिकांमध्ये पूर्णपणे गुंतून जाऊन बाह्य विश्वाचा विसर पडताना पाहून आमचं काम अधिक सोपं झालं.


तुम्ही आजपर्यंत 500 पेक्षा अधिक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत, पण हाच चित्रपट त्या सर्वांपेक्षा वेगळा कसा उठून दिसतो?
मला सतत पुढे पुढे जायला आवडतं. मला नवनवे प्रयोग करायला आणि माझ्यातील अभिनेत्याचा शोध घ्यायला आवडतं. माझ्या अभिनयकौशल्याचा कस लावताना मला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे मला सदैव सतर्क राहावं लागतं. ‘दि काश्मीर फाइल्स’ हा सर्वार्थाने वेगळा चित्रपट होता. हा चित्रपट म्हणजे केवळ एक पटकथा किंवा संवादांची मालिका नाहीये, हे सत्य आहे. माझं सत्य. म्हणूनच तो सर्व चित्रपटांमध्ये उठून दिसला आणि त्याने सार्‍्या जगावर आपला ठसा उमटविला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in