
अभिनेत्री तुनिषा शर्माने अवघ्या २०व्या वर्षी आत्महत्या केल्यानंतर सिनेक्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या तुनिषाने कमी वयात आपली वेगळीच छाप पाडली होती. तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाचा सहकलाकार असलेला शिझान मोहम्मद खान आणि तिचे प्रेमसंबंध होते, पण यातून नैराश्य आल्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिझान खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या अशिलावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिझान खान आणि तुनिषा या दोघशांचेही प्रेमसंबंध होते. १५ दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेक झाले होते. यामुळे ती प्रचंड तणावात होती. यामधून आलेल्या नैराश्यामुळे तिने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले. तुनिषा आणि शिझान खान हेदोघेही 'अलीबाबा- दास्तान ए काबुल' या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. मालिकेचे चित्रीकरण सुरु असतानाच व्हॅनिटीमध्ये तिने स्वतःला गळफास लावून घेतला होता.