शास्त्रीय संगीताचा दीप मालवला; उस्ताद राशिद खान यांचे निधन

शास्त्रीय संगीताबरोबरच उस्ताद राशिद खान यांनी हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली होती.
शास्त्रीय संगीताचा दीप मालवला; उस्ताद राशिद खान यांचे निधन

कोलकाता : प्रख्यात शास्त्रीय गायक, संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उस्ताद राशिद खान यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली. उस्ताद राशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. रामपूर-सहसवान घराण्याचे गायक असलेल्या उस्ताद राशिद खान यांच्या गायकीवर पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता.

राशिद खान गेल्या काही काळापासून प्रोस्टेट कर्करोगाने आजारी होते. कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उस्ताद राशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते. ‘आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांनी दुपारी ३.४५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे जन्मलेले राशिद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून घेतले. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता.

उस्ताद राशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खाँ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. दोन्ही गायकांचा प्रभाव त्यांच्या गाणे म्हणण्याच्या शैलीत जाणवत असे. एका मुलाखतीत उस्ताद राशिद खान यांनी पंडित भीमसेन जोशींची खास आठवण सांगितली होती. “मला साक्षात पंडितजींसह गाणं म्हणायची संधी मिळाली. आमची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. ही जुगलबंदी झाल्यानंतर पंडितजींनी माझं कौतुक केलं होतं. तसेच साताऱ्याहून माझ्यासाठी खास विड्याची पाने ते पाठवायचे.” अशी आठवण राशिद खान यांनी सांगितली होती.

शास्त्रीय संगीताबरोबरच उस्ताद राशिद खान यांनी हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली होती. त्यात शाहीद कपूर आणि करिना कपूर यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील 'आओगे जब तुम' ही बंदिश, 'माय नेम इज खान', 'राझ ३', 'मंटो' आणि 'शादी में जरूर आना' यांसारख्या चित्रपटांमधील गाणी देखील उस्ताद राशिद खान यांनी गायली आहेत. राशिद खान यांना पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणदेखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in