उस्ताद झाकीर हुसेन : जादुई ताल हरपला!!!

तबलानवाज झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण संगीत क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली.
उस्ताद झाकीर हुसेन
उस्ताद झाकीर हुसेन
Published on

तबलानवाज झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण संगीत क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली. हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवले आणि भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून काम केले. त्यांचे निधन ही संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अपरिमित हानी आहे, अशा शब्दात हुसेन यांना स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हुसेन यांच्या निधनाने संगीत विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. हुसेन यांनी संगीताच्या सीमारेषा पुसून टाकल्या आणि जागतिक संगीत क्षेत्राला भारतीय संगीताची गोडी दिली, असे अनेकांनी सांगितले.

उस्ताद झाकीर हुसेन यांनी भारतीय संगीताचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवला. त्यांच्या जादुई तबलावादनासह नम्रता आणि आदराने लोकांच्या हृदयात त्यांनी विशेष स्थान मिळवले. दुसरा झाकीर कधीच होणार नाही, असे अनेकांनी शोकभावनेत म्हटले आहे. त्यांच्या संगीताचा ठसा अजरामर राहील आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही आवर्जून नमूद केले. हुसेन यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेले आणि तबला या वाद्द्याला नवी ओळख दिली. त्यांचे निधन हे संगीत क्षेत्रासाठी अपरिमित हानी आहे. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात ते कायम `वाह उस्ताद` या शब्दांनी अजरामर राहतील...

शालेय आणि सुरुवातीचा संघर्ष

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील जादुगार काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईतील माहिमच्या सेंट मायकेल स्कूलमधून त्यांचे प्राथमिक तर सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांचे उच्च शिक्षण झाले. लोकलने प्रवास करताना तबल्याची पवित्रता राखण्यासाठी ते नेहमीच तबला मांडीवर घेऊन बसत. वयाच्या १२व्या वर्षी वडिलांसोबत केलेल्या एका कार्यक्रमात मिळालेले पाच रुपये मानधन त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वांत मौल्यवान कमाई ठरली होती.

तबला हीच पूजा

झाकीर हुसेन सांगत, त्यांच्या वडिलांनी त्यांचे या क्षेत्रातील स्वागत तबल्याच्या लयींनी केले. त्यावेळी त्यांच्या आई हुसेन यांना प्रार्थना का नाही केली, अशी विचारणा करत. त्यावर अल्लारक्खा म्हणायचे, तबला हेच पूजन आहे.

पुरस्कार आणि सन्मान

हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत मानाचे चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्यातील तीन पुरस्कार २०२३ मध्ये मिळाले. भारत सरकारने त्यांना १९८८ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण, आणि २०२३ साली पद्मविभूषण या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले.

वाह ताज ते मिले सुर मेरा तुम्हारा…

१९८८मध्ये ताज महल चहा ब्रँडच्या जाहिरातीमुळे हुसेन यांनी घराघरांत ओळख मिळवली. त्याच वर्षी त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी `मिले सुर मेरा तुम्हारा` या राष्ट्रीय एकात्मतेच्या गीतामध्ये योगदान दिले. `वाह ताज`मुळे ते अभिनयातही नावजले गेले.

संगीत क्षेत्रातील योगदान

झाकीर हुसेन यांना त्यांच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ तबलावादक मानले जाते. त्यांनी वयाच्या ७व्या वर्षी संगीत प्रवास सुरू केला. वडिलांकडून - प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारक्खा यांच्याकडून त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. पंडित रवी शंकर, अली अकबर खान, शिवकुमार शर्मा यांसारख्या दिग्गज भारतीय कलाकारांसह त्यांनी मैफल सजवली. झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. भारतीय संगीत आणि जागतिक संगीताच्या फ्युजनमध्ये त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. अद्वितीय योगदानामुळे त्यांना चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले.

तबलावाद्याचा नवा अध्याय

जॉन मॅक्लॉफलिन, व्हायोलिन वादक एल. शंकर आणि तालवादक टी. एच. 'विकू' विनायकम यांच्यासह केलेला प्रकल्प भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझच्या फ्युजनसाठी प्रसिद्ध ठरला. त्यांचे कार्य पाश्चात्य संगीतकारांसोबतही महत्त्वाचे होते. त्यांनी पश्चिमेकडील यो-यो मा, चार्ल्स लॉइड, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि जॉर्ज हॅरिसन यांच्या सहकार्याने भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचवले. उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्याला भारतीय शास्त्रीय संगीताच्या सीमारेषांच्या बाहेर नेऊन जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. तबल्यावर विलक्षण कौशल्याने त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि जागतिक जॅझ संगीताचा फ्युजन तयार केला. शक्ती ग्रुपसह त्यांनी भारतीय संगीताचा आणि जॅझचा सुरेख मेळ घातला.

संगीतकार, अभिनेता आणि बरेच काही

उस्ताद हुसेन यांनी चित्रपट संगीतासाठीही योगदान दिले. यामध्ये मंटो आणि मिस्टर अँड मिसेस अय्यर चित्रपटांचा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर `साज`सारख्या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. गानकोकिळा लता मंगेशकर व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या करिअरवर आधारित मानले जाणाऱ्या चित्रपटात झाकीर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याबरोबर अभिनय केला होता.

व्यक्तिमत्त्वाचा ठसा

झाकीर हुसेन यांनी केवळ त्यांच्या तबल्याच्या कौशल्यानेच नव्हे तर त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने जगभरात चाहत्यांची मने जिंकली. १९९४ मध्ये `जेंटलमन` मासिकाच्या वाचकांनी त्यांना सर्वात आकर्षक पुरुष म्हणून निवडले होते. माॅडल म्हणूनही त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील एक अनोखी भूमिका वठविली. त्याच जोरावर त्यांना चित्रपट, जाहिरातीतही छाप पाडता आली. शास्त्रीय तसेच चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी स्वत:ला सिद्ध केले.

लयबद्ध प्रार्थनेचा प्रारंभकर्ता ते जागतिक संगीताचा शिरोमणी

संगीताचा अभ्यास, आणि तबल्याच्या परंपरेतील उल्लेखनीय वारसा यांचे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आयुष्यात विशेष स्थान राहिले. त्यांच्या वडिलांनी - उस्ताद अल्लारक्खा यांनी नवजात झाकीरच्या कानात तबल्याच्या लयबद्ध रचना सांगितल्या. उस्ताद अल्लारक्खा यांच्याकडून संगीताचे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. झाकीर हुसेन यांचा जन्म आणि लहानपण मुंबईतलेच. वयाच्या सातव्या वर्षी पहिल्या कार्यक्रमात सहभाग आणि वयाच्या बाराव्या वर्षी देशभर दौरे केले.

...…आणि उस्ताद पदवी मिळाली

आपल्या जादुई बोटांनी तबल्यावर वेगवान सूर उमटविणारे झाकीर हुसेन यांना जगमान्यता मिळालेली उस्ताद ही पदवी प्रसिद्ध संतूरवादक पंडित रवि शंकर यांनी सर्वप्रथम दिली. १९८८ मध्ये मुंबईत एका काऱ्यक्रमात हुसेन हे रवि शंकर यांच्यासह जुगलबंदीनिमित्त एकत्र आले असताना समोर व्यासपीठावर बसलेल्या हुसेन यांचे अब्बाजान - उस्ताद अल्लारख्खा यांना कुणीतरी हुसैनना पद्मश्री मिळाल्याचे सांगितले. त्यांनी तो निरोप रवि शंकर यांना दिला. आणि रवि शंकर यांनी हुसेन यांना उस्ताद संबोधित या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाची घोषणा केली.

असा तबला वाजणार नाही - महादेवन

झाकीर हुसेन हे ज्ञान, कौशल्य आणि रंगमंचावरच्या उपस्थितीचा दुर्मिळ संगम होते, असे संगीतकार, गायक शंकर महादेवन यांनी म्हटले आहे. हुसेन यांच्याबाबतच्या आठवणी जागवितांना महादेवन यांनी आपल्या शक्ती आल्बमला संगीत कारकिर्दीतील सर्वात मोठी प्रेरणा म्हणून संबोधले आहे.

५७ वर्षीय महादेवन यांनी सांगितले की, हुसेन यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वासच बसत नाही. मी माझ्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा, गुरु आणि माझ्या संगीताला प्रभावीत करणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांनी माझ्या संगीत कारकिर्दीत फार मोठी भूमिका बजावली. ते जगातील सर्वांत महान होते.

महादेवन म्हणाले की, मी कधीही इतकी संगीतात्मकता असलेला ताल कलाकार पाहिला नाही. असा कलाकार पुन्हा होणार नाही. एखाद्याकडे फक्त ज्ञान असेल किंवा फक्त कौशल्य असेल. परंतु ज्ञान, कौशल्य आणि रंगमंचावरची उपस्थिती अशा स्तरावरचा कलाकार पुन्हा जन्माला येणे अशक्य आहे. तबला कधीही पुन्हा असा वाजणार नाही.

`शक्ती`पूर्ण मैत्री

१९७३ मध्ये जॉन मॅकलॉघलिन, व्हायोलिनवादक एल. शंकर, झाकीर हुसेन आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायकम यांनी शक्तीची स्थापना केली. १९९७ मध्ये मॅकलॉघलिन आणि झाकीर हुसेन यांनी विक्कू यांचे पुत्र घटमवादक व्ही. सेल्वगणेश, मँडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांना शक्तीत सहभागी केले. शक्तीने "दिस मोमेंट" या अल्बमसाठी २०२४चा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. या आल्बममध्ये व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन यांचा समावेश आहे. शक्तीसाठीच्या पुरस्काराशिवाय हुसेन यांनी "पश्तो"साठी सर्वोत्तम जागतिक संगीत सादरीकरणाचा आणि "अॅाज वी स्पीक" साठी सर्वोत्तम समकालीन वाद्य अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.

छायाचित्र सौजन्य : पीटीआय

...त्यांनी माझे आयुष्य घडविले; तबलानिर्माते हरिदास व्हटकर यांनी जागविल्या आठवणी

गेल्या दोन दशकांत आपण उस्ताद हुसेन यांच्यासाठी किती तबले बनवले याची "गणतीच नाही". झाकीर साहेबांचे आपल्याकडे बरेच तबले अजूनही आहेत. मी त्यांच्यासाठी तबला बनवला आणि त्यांनी माझे जीवन घडविले... भावूक हरिदास व्हटकर व्यक्त होतात.

मुंबईतील हरिदास व्हटकर यांनी १९९८ पासून उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासाठी तबले तयार केले आहेत. मी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांसाठी - अल्ला रक्खांसाठी तबला बनवण्यास सुरुवात केली आणि १९९८ पासून झाकीर हुसेन साहेबांसाठी तबला बनवला, असे कांजूरमार्ग येथे आपली कार्यशाळा चालविणारे व्हटकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

मुळचे पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथील तिसऱ्या पिढीतील तबला निर्माते असलेल्या व्हटकर यांनी सांगितले की, उस्तादजींना नेहमी विशिष्ट प्रकारचा तबला हवा असायचा आणि त्याबाबतीत ते खूप काटेकोही होते. त्यांनी तबल्याच्या 'सुरावट' भागावर विशेष लक्ष दिले. झाकीरसाहेब 'ट्युनिंग'बद्दल खूपच जागरूक असायचे. हुसेन यांच्या संपर्काबद्दल ५९ वर्षीय व्हटकर यांनी सांगितले की, त्यांच्याशी नियमित संपर्क असा नसायचा. मात्र तबल्याबाबत काही असले की ते आवर्जून फोन करायचे. नवीन तबल्याबद्दल विचारायचे किंवा जुन्या वाद्यांच्या दुरुस्तीबद्दलही सांगायचे. आमचे संवाद महिन्यांच्या अंतराने असायचे.

चौथी पिढीही तबला निर्मितीत

व्हटकर यांनी तबला निर्मिती क्षेत्रात आजोबा केरप्पा रामचंद्र व्हटकर आणि वडील रामचंद्र केरप्पा व्हटकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवेश केला. त्यांचे पुत्र किशोर आणि मनोज यांनीदेखील तबला निर्मितीची कौटुंबिक परंपरा सुरू ठेवली आहे. व्हटकर यांनी लहान वयातच तबला बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि नवकल्पना व परिपूर्णतेचा यांची सांगड घातली. १९९४ मध्ये ते मुंबईला आले आणि मुंबईतील प्रसिद्ध हरिभाऊ विश्वनाथ कंपनीत तबला निर्मात्याच्या रूपात त्यांनी काम सुरू केले.

छायाचित्र सौजन्य : पीटीआय

`तो` फक्त सुरांसाठीच जगला - चौरसिया

मुंबई : जो व्यक्ती फक्त वाद्य, ताल आणि सुरांसाठी जगला, त्याच्यासोबत असे कसे होऊ शकते, असा भावूक सवाल ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांनी केला आहे. झाकीर यांच्याबरोबर अनेकदा मैफल सजविणाऱ्या चौरसिया यांच्याबरोबरच्या कलाकृतीत १९९९ मधील "रिमेंबरिंग शक्ती" या आल्बमचा समावेश आहे.

चौरसिया म्हणतात, हुसेन हे फक्त त्यांच्या तबल्यासाठी, तालासाठी आणि सुरांसाठी जगले. झाकीर हुसेन यांना त्यांच्या पिढीतील महान तबला वादक मानले जाते. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केले. सातव्या वर्षापासूनच वादन सुरू करून त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रख्यात कलाकारांसोबत सहकार्य केले.

श्रद्धांजली

झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे. हुसेन हे त्यांच्या विलक्षण सर्जनशीलतेसाठी आणि नवकल्पकतेसाठी ते ओळखले जात. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीत परंपरांमधील ते एक सेतू होते. त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्याचा सन्मान मला मिळाला.

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

झाकीर हुसेन यांच्या "अद्वितीय कौशल्या"चे देशाला कौतुक राहिले. ते सदैव लोकांच्या हृदयात राहतील. हुसेन यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचवले. त्यांची कला भारतीय संस्कृतीवर एक अमिट छाप सोडून गेली आहे.

- जगदीप धनखड, उपराष्ट्रपती

झाकीर हुसेन एक खरे प्रतिभावंत होते. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे विश्व बदलले. त्यांनी तबल्याला जागतिक स्तरावर नेऊन लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे सर्जनशील सादरीकरण आणि भावनिक रचना संगीतप्रेमींना आणि कलाकारांना प्रेरित करत राहतील. संगीत समुदायाला माझ्या संवेदना आहेत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

झाकीर हुसेन यांच्या निधनाने कला आणि संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. झाकीर हुसेन आपल्या जीवनाला तबल्याच्या माध्यमातून जगले आणि भारतीय संगीताला जागतिक स्तरावर त्यांनी सन्मान मिळवून दिला.

- राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

झाकीर हुसेन हे "संगीत प्रतिभावंत" होते. त्यांच्या रचनांनी भाषेच्या आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून लोकांपर्यंत भावना पोहोचवल्या. आज एक ताल शांत झाला आहे. झाकीर हुसेन यांच्या निधनाने आपण व्यथित झालो आहे.

- अमित शहा, गृहमंत्री

झाकीर हुसेन यांचा वारसा वारसा त्यांच्या "कालातीत संगीत"द्वारे लोकांच्या हृदयात राहील. त्यांच्या भारतीय शास्त्रीय आणि जागतिक संगीतातील प्रगल्भ योगदानासाठी त्यांच्या कलात्मकतेने असंख्य हृदयांना स्पर्श आहे.

- जे पी नड्डा, भाजप अध्यक्ष

झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे भारताने आणि जगाने एक संगीत प्रतिभावंत आणि सांस्कृतिक दूत गमावला आहे.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष

झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे जगाची हानी झाली आहे. सरस्वतींच्या महान सुपुत्राची संस्कृतीवर नितांत श्रद्धा होती. त्यांनी तबल्याला आकर्षक दर्जा दिला.

- सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार विभागप्रमुख

देशाने प्रतिष्ठित सांस्कृतिक चिन्ह गमावले आहे. हुसेन यांनी तबल्याला जागतिक स्तरावर नेले. त्यांनी भारतीय संगीतप्रेमींना मोहून टाकले. हुसेन यांनी तीन पिढ्यांच्या संगीतकारांसोबत भूमिका निभावली.

- सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल

तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले.

- देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

झाकीर हुसेन यांच्या निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. त्यांनी भारतीय संगीताचा एक महत्त्वाचा वाद्य तबल्याला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा दिली. हुसेन यांच्या निधनाने संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

हुसेन यांच्या निधनाने संगीत जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला आणि शोकाकुल चाहत्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.

- योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

हुसेन यांच्या निधनाने पुन्हा एकदा इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (आयपीएफ) या दुर्धर रोगावर प्रकाश पडला आहे. हा फुफ्फुसांशी संबंधित रोग असून दुर्धर आजारांविषयी जागरूकतेची गरज आहे.

- डॉ. अभिजीत आहुजा, सैफी हॉस्पिटलचे पुलमोनोलगीस्ट

हुसेन हे सर्व काळातील महान तबला वादकांपैकी एक होते. ते एक महान तबला वादक आणि संगीतातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जाणे देशासाठी आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी एक मोठी हानी आहे.

- ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री

झाकीर खूप लवकर आपल्यातून गेले. पण त्यांनी दिलेली कला सदैव आपल्यासोबत राहील.

- अभिनेता कमल हसन

झाकीरजींनी तबल्याला प्रमुख स्थान दिले. त्यांचे योगदान अद्वितीय आहे.

- चित्रपट निर्माता हंसल मेहता

झाकीर हे जागतिक संगीतविश्वातील एक चमत्कार होते.

- अमजद अली खान वसरोदवादक

तबल्याला जागतिक मान्यता देणारे झाकीर हे एक प्रेरणास्थान होते.

- ए. आर. रहमान, संगीतकार

झाकीर हुसेन यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. तबला त्यांच्या हाताखालून 'बोलत' असे.

- संतूर वादक पंडित तरुण भट्टाचार्य

झाकीरजी कौशल्य आणि ज्ञानाचा खजिना होते. त्यांनी अनेक संगीतकारांच्या कारकिर्दीला दिशा दिली. त्यांचा वारसा कायम राहील.

-रिकी केज ग्रॅमी पुरस्कार विजेते

logo
marathi.freepressjournal.in