Ved Movie : अतूट प्रेम, त्याग अन् समर्पणाचे 'वेड'

'वेड' या सिनेमाची कथाही प्रेक्षकांना प्रेमासाठी केलेल्या त्यागाची, समर्पणाची, प्रेमात दिलेल्या वचनांची, नात्यातल्या हळव्या गोष्टीची रूपं नव्याने प्रेक्षकांसमोर उलगडून ठेवणार आहे.
Ved Movie : अतूट प्रेम, त्याग अन् समर्पणाचे 'वेड'

"प्रेम.. प्रेम असतं समुद्रासारखं.. कुणाच्या नशीबी लाट, कुणाच्या नशीबी काठ... प्रेम मुठीतल्या वाळूसारखं... मूठ आता भरलेली, आता नाही... पण प्रेम असतं प्रेमासारखंच.. काही वेड्यासारखे प्रेम करतात.. काही प्रेमातलं वेड होतात.."

लेखक- दिग्दर्शकाला प्रेमकथा कायम आकर्षित करीत असतात.. त्यामुळे प्रेक्षकांना प्रेमाची विविध रूपे दाखवता येत असतात... 'वेड' या सिनेमाची कथाही प्रेक्षकांना प्रेमासाठी केलेल्या त्यागाची, समर्पणाची, प्रेमात दिलेल्या वचनांची, नात्यातल्या हळव्या गोष्टीची रूपं नव्याने प्रेक्षकांसमोर उलगडून ठेवणार आहे. दरम्यान, 'वेड' चित्रपट साऊथ सिनेमाच्या मजिली'च्या कथेवर आधारित आहे.

कलाकार : रितेश देखमुख, जिनीलिया देशमुख, अशोक सराफ, खुशी हजारे, जया शंकर, रविराज खाडे, शुभंकर तावडे, राहुल देव

दिग्दर्शक : रितेश देशमुख

संगीत : अजय-अतुल

कथा : शिवा निर्वाणा

दर्जा : साडेतीन स्टार

कालावधी : १ तास ५० मिनिटे

प्रेमात आकंठ बुडालेल्या, प्रेमाचं, विरहाच वेड लागलेल्या सत्याची ही गोष्ट आहे. श्रावणी आणि सत्या यांचं तरूणपणातलं अगदी कोवळ्या वयातलं प्रेम दाखवलं असून, ज्यामध्ये प्रेक्षकांना तारूण्य, कोवळं प्रेम, ऊर्जा आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडणाऱ्या आहेत. पण, दुसरं प्रेम जे आहे ते समजूतदारपणा, भावना, दु:ख, विरह या सगळ्या भावनांचं मिश्रण आहे.

सत्या हा त्याचे वडील दिनकर (अशोक सराफ ) यांच्यासोबत राहत असतो. त्याला क्रिकेटर होण्याचे स्वप्न असते. क्रिकेट संघात जाण्यासाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्याची भेट निशाशी होते. गैरसमजानंतर ते जवळ येतात आणि प्रेमात पडतात. दरम्यान, नंतर निशाचे वडील त्या दोघांना वेगळे करतात. या दरम्यान, निशा त्याला पुन्हा परत येण्याचे वचन देते; मात्र परत येत नाही. सत्या या काळात निशाच्या विरहात आकंठ उदास अवस्थेत जाऊन व्यसनं करायला लागतो. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर ढकलला जातो.

दरम्यान, श्रावणीचे सत्यावर बालपणापासून प्रेम असते. सत्याला उदास अवस्थेत बघून त्याच्या वडिलांचे दुःख पाहून ती त्याच्याशी लग्न करते. त्यानंतर त्या दोघांच्या नात्यातील खुलत जाणारे प्रेम, त्याग, समजूतदारपणा, दु:ख आणि अशा प्रेमाच्या विविध नावीन्यपूर्ण बाजू प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळतील. सत्या अन् श्रावणी म्हणजेच रितेश अन् जिनीलिया केमिस्ट्री प्रेक्षकांना वेड लावून सोडणार आहे. 'वेड' सिनेमातील सत्याची भूमिका साकारताना रितेशची गंभीर मुद्रा, चित्रीकरण आणि संवाद प्रेक्षकांना खरोखरच 'वेड' लावणारे आहेत. श्रावणीची व्यक्तिरेखा साकारत 'या' चित्रपटातून जिनीलिया ही पहिल्यांदाच मराठीत काम करीत असली, तरी तिची अस्खलित मराठी आणि बोलका अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. यासोबतीला अशोक सराफ यांनी साकारलेले सत्याचे वडील अप्रतिम आहेत. तसेच सत्याची प्रेयसी, निशाची भूमिका करणाऱ्या जिया शंकर हिचा अभिनय भाव खाऊन जाणारा आहे. या सगळ्यांत खुशी नावाची भूमिका साकारणाऱ्या खुशी हजारे या मुलीने केलेला अभिनय अप्रतिम आहे. 'वेड'साठी अजय अतुल यांनी संगीत दिले असून, यांचं संगीत ही सिनेमाची जमेची बाजू आहे.

साऊथच्या 'मजिली'चा मराठी रिमेक

'वेड' हा सिनेमा साऊथ सिनेमा 'मजिली'चा मराठी रिमेक आहे. जी दृश्यं मजिली या सिनेमात आहेत तशी तंतोतंत मिळती जुळती 'वेड' सिनेमात आहेत. मजिली हा नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूची भूमिका असलेला चित्रपट आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in